पत्रकार परिषदेत पदाधिकाऱ्यांनी दिली माहिती
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
विश्व हिंदू परिषद केंद्रीय प्रन्यासी मंडळ आणि केंद्रीय प्रबंध समितीची आंतरराष्ट्रीय स्तराची बैठक यंदा जळगावात आयोजित केली आहे. गेल्या ६१ वर्षांच्या इतिहासात ही बैठक महाराष्ट्रात केवळ तीन वेळा (पुणे, मुंबई आणि नागपूर) झाली आहे. विशेष म्हणजे ही बहुतांशी मेट्रो शहरांमध्येच होते. त्यामुळे पहिल्यांदाच जळगावसारख्या शहराला बैठकीचा मान मिळाला आहे. त्यामुळे हा जिल्ह्यासाठी एक मोठा सन्मान मानला जात असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांत मंत्री योगेश्वर गर्गे यांनी बुधवारी, १६ जुलै रोजी दुपारी १२ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, जळगावमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिनिधींचे आगमन ही शहरासाठी एक ऐतिहासिक बाब मानली जात आहे.
बैठकीचे एमआयडीसी परिसरातील बालाणी लॉन्स येथे आयोजन केले आहे. बैठकीसाठी देशभरातून आणि पाच वेगवेगळ्या देशांमधून असे सुमारे ३०० प्रतिनिधी उपस्थित राहतील. त्यात विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अलोक कुमार, राष्ट्रीय महामंत्री बजरंग लालजी बागडा, संघटन महामंत्री मिलिंद परांडे, अयोध्या येथील श्रीराम मंदिर न्यासचे सचिव चंपतराय यांच्यासारखे अनेक केंद्रीय पदाधिकारी आणि महत्त्वाचे संघटनात्मक व्यक्ती उपस्थित राहतील.
विविध समित्या स्थापन, ७५ कार्यकर्ते कार्यरत
पाच दिवसांच्या बैठकीदरम्यान प्रतिनिधींची निवासी व्यवस्थाही बालाणी लॉन्स येथेच केली आहे. बैठकीच्या नियोजनासाठी भोजन, निवास, यातायात, वैद्यकीय सेवा अशा विविध समित्या स्थापन केल्या आहेत. त्यात सुमारे ७५ कार्यकर्ते कार्यरत आहेत. बैठकीत विहिंपच्या आतापर्यंतच्या कामांचे चिंतन केले जाईल. तसेच भविष्यातील कार्याची दिशा आणि नियोजन निश्चित केले जाईल, असेही पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली.