मनपातील आयुक्तांच्या कार्यालयासमोर महिलांनी केले ठिय्या आंदोलन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील जुना खेडी रस्त्यासह आजूबाजूच्या परिसरातील महिला सोमवारी, १४ जुलै रोजी रस्त्यावर उतरल्या. महानगरपालिका प्रशासनाच्या दीर्घकालीन दुर्लक्षाविरुध्द त्यांनी आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत नागरी सुविधांबाबत जोरदार आवाज उठविला. शांततेत पार पडलेल्या आंदोलनाने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
शहरातील जुना खेडी रस्ता, डीएनसी कॉलेज परिसर, दत्तनगर, सुनंदिनी पार्क आणि गट क्रमांक ७५ ते ७८ परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांची दुरवस्था, गटारांची दुरुस्ती, वीज डीपींचा अभाव तसेच कचऱ्याच्या समस्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. अशा पार्श्वभूमीवर महिलांनी एकत्र येत ठोस कृतीची मागणी केली. आंदोलनादरम्यान महिलांनी प्रशासकीय दुर्लक्षाविरुध्द “फक्त आश्वासन नको, कृती हवी” अशा घोषणा दिल्या.शांततेत पार पडलेल्या आंदोलनात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. आंदोलकर्त्या महिलांचे शिष्टमंडळ आणि माजी नगरसेवक भरत सपकाळे यांनी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची भेट घेतली. त्यांनी आपल्या भागातील समस्यांचा सविस्तर पाढा आयुक्तांसमोर मांडला. विशेषतः पावसाळ्यात रस्त्यांसह गटारांची दयनीय अवस्था, कचऱ्याचे ढीग आणि रात्रीच्या वेळेस अंधारमय गल्लीबोळमुळे महिलांसह लहान मुलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
५८ कोटींच्या मंजूर निधीमधून या भागात रस्त्यांसह गटारींच्या कामांचा समावेश केला आहे आणि त्या कामांना लवकरच सुरुवात होणार असल्याचे यावेळी मनपाचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी महिलांना आश्वासन देतांना सांगितले. मात्र, त्यावर नाराजी व्यक्त करत “आता बोलण्यापेक्षा कृती महत्त्वाची” अशी ठाम भूमिका महिलांनी घेतली. काम तात्काळ सुरू न झाल्यास पुढील आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही महिलांनी दिला आहे.
महिलांचा प्रशासनाशी काही काळ झाला वाद
आंदोलनादरम्यान, महिलांचा प्रशासनाशी काही काळ वाद झाला. संतप्त महिलांनी प्रशासकीय आश्वासनांवर विश्वास न ठेवता वेळेवर कृती झाली पाहिजे, असा ठाम पवित्रा घेतला. आंदोलनामुळे महानगरपालिका प्रशासन जागे होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. यावेळी परिसरातील असंख्य पुरुषांनीही महिलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.