Chincholi Gets Approval : चिंचोलीला ५० खाटांची क्रिटिकल केअर इमारत मंजूर

0
23

जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या हस्ते भूमिपूजन

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

तालुक्यातील चिंचोली येथे उभारण्यात येत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संकुलात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आयुष्मान भारत इन्फ्रास्ट्रकचर योजनेतून मंजूर ५० खाटांच्या क्रिटिकल केअर युनिट इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन रविवारी, १३ जुलै रोजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी खा. स्मिताताई वाघ, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्यासह वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आयुष्मान भारत इन्फ्रास्ट्रकचर योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या क्रिटिकल केअर युनिटसाठी स्वतंत्र इमारत उभारण्यात येत आहे. त्यामध्ये ५० खाटांची उच्चस्तरीय उपचार सुविधा असणार आहे. हे युनिट भविष्यातील आपत्कालीन परिस्थितींसह गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हा ६५० खाटांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. अशा नवीन युनिटमुळे खाटांची संख्या वाढून ७०० वर जाणार आहे. जिल्ह्यातील वैद्यकीय शिक्षणासह उपचार सुविधा यामार्फत आणखी सक्षम होणार आहे.

नवीन इमारतीच्या बांधकाम प्रगतीची केली पाहणी

कार्यक्रमानंतर जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकाम प्रगतीची पाहणी केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाच्या टप्प्यांची माहिती घेऊन कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच प्रकल्पामुळे ग्रामीणसह शहरी भागातील रुग्णांना अत्याधुनिक आरोग्यसेवा मिळणार अाहे. हा प्रकल्प जळगावच्या आरोग्य क्षेत्रातील एक मोठा टप्पा ठरणार असल्याचेही ना.महाजन म्हणाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here