उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी दिली माहिती
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील आर. आर. विद्यालयात नववीत शिकत असलेल्या कल्पेश इंगळे या विद्यार्थ्याचा शाळेतीलच एका अल्पवयीन मुलाकडून झालेल्या हाणामारीत मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी शनिवारी, १२ जुलै रोजी दिली. दरम्यान, कल्पेशच्या शवविच्छेदनानंतर इंगळे कुटुंबाने त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन कल्पेशवर अंत्यसंस्कार केल्याचेही त्यांनी सांगितले. सुरुवातीला त्याच्या मृत्यूप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, त्याच्या मृत्यूचा उलगडा झाल्यानंतर आता जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणातील त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला आरोपी हा विधिसंघर्षित (अल्पवयीन) विद्यार्थी आहे, हे विशेष. त्याला बाल न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिसांनी शाळेच्या परिसरातील डीव्हीआरही जप्त केले असून हाणामारीच्या कारणाची सविस्तर चौकशी सुरु केली आहे. ही घटना शाळेतील शौचालयाजवळ घडली असल्याचेही सांगण्यात आले.
शहरातील आर.आर.विद्यालयात खेळत असताना नववीच्या वर्गातील विद्यार्थी कल्पेश वाल्मीक इंगळे (वय १५, रा. कठोरा, जि. बुलढाणा, ह.मु. कासमवाडी, जळगाव) हा अचानक जमिनीवर पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी, ११ जुलै रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी कल्पेशच्या आई-वडिलांनी इतर विद्यार्थ्यांकडून त्याला मारहाण झाल्याचा आरोप केला होता. तो आरोप आता पोलिसांनी लावलेल्या तपासात खरा ठरला आहे. शाळेच्या मधल्या सुट्टीत दुपारी तीन वाजता जेवणासाठी सुट्टी झाली होती. तेव्हा तो विद्यार्थ्यांसोबत खेळत होता. त्यावेळी तो अचानक जमिनीवर कोसळल्याची माहिती शाळेच्या शिक्षकांनी दिली होती. त्याला शिक्षकांनी उचलून तातडीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केले होते. यावेळी कल्पेशच्या आई-वडील, भाऊ यांनी एकच आक्रोश केला होता.
शाळेच्या प्रशासनानेही केली कुटुंबियांची दिशाभूल
कल्पेश सकाळी शाळेत गेला तेव्हा चांगला होता. त्याचा दोन दिवसांपूर्वीही वाद झाला होता. त्यामुळे शाळेचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात येऊन चौकशी करावी, दोषींना अटक करून कारवाई करावी, त्यानंतरच मृतदेह ताब्यात घेणार असल्याचा पवित्रा मृत कल्पेशच्या कुटुंबियांनी घेतला होता. याप्रकरणी मयत कल्पेशच्या मित्रांची चौकशी करुन माहिती समोर आली. कल्पेशशी झालेल्या हाणामारीत तो खाली पडला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना शाळेतील ज्या शौचालयाजवळ घडली त्याठिकाणी कॅमेरे नव्हते. त्यामुळे अद्यापही यासंदर्भात चौकशी केली जाणार आहे. शाळेच्या प्रशासनानेही कुटुंबियांची दिशाभूल करुन व्यवस्थित माहिती न दिल्याची तक्रार त्यांनी केली आहे. तसेच संबंधितांवरही कारवाईची मागणी केली आहे. कल्पेशच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. तपास पीएसआय गोपाल देशमुख करीत आहे.