ग्रामस्थ त्रस्त, कनिष्ठ अभियंता नसल्याने परिस्थिती बनली गंभीर
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील तळेगाव भागात गेल्या महिन्याभरापासून कनिष्ठ अभियंता नियुक्त नसल्यामुळे तळेगाव, शेळगाव आणि परिसरातील आठ गावांमध्ये वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. सतत खंडित होणारी वीज सेवा आणि दुरुस्तीची विलंबित कार्यपद्धतीमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
जामनेर तालुक्यातील तळेगाव, शेळगावसाठी स्वतंत्र गावठाण वीज फीडरचे काम पूर्ण झाले असले तरीही संबंधित ट्रान्सफॉर्मर (विद्युत रूपांतरण यंत्र) बसविण्यात अद्यापही विलंब होत आहे. परिणामी, पावसाळ्यात वारंवार वीज खंडित होते आणि नागरिकांना अंधारात रहावे लागते. या गावांमध्ये एकाच वीजवाहिनीवरून आठ गावांना वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे या गावांपैकी कोणत्याही एका गावात बिघाड झाला तरी संपूर्ण वीज वाहिनी बंद पडते. त्यामुळे सर्व गावांमध्ये वीज खंडित होते.
तसेच, वीज पुरवठा बंद झाल्यास नागरिकांनी संपर्क साधण्यासाठी तळेगाव येथील उपकेंद्रावर (सबस्टेशन) कोणाशी बोलावे, याबाबत अनिश्चितता आहे. उपकेंद्रावर दूरध्वनी (लँडलाईन) किंवा मोबाईल संपर्काची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना योग्य अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे. उपकेंद्रावर कार्यरत असणारे ऑपरेटर सतत बदलत असल्यामुळे नेमके कोण ड्युटीवर आहे, हे नागरिकांना माहिती नसते. शिवाय, वीज खंडित झाल्याचे तत्काळ निदर्शनास आणून देणारी यंत्रणा (अलर्ट सिस्टम) बिघडली आहे. त्यामुळे ऑपरेटरला वीज खंडित झाल्याची माहिती फक्त ग्रामस्थांकडून फोन आल्यावरच मिळते. पण, नागरिकांकडे संपर्क क्रमांक आणि दूरध्वनी सुविधा नसल्यामुळे माहिती वेळेवर पोहोचत नाही.
तळेगाव उपकेंद्रावर नियमित कनिष्ठ अभियंता नेमण्याची होतेय मागणी
अशा सर्व अडचणींमुळे अनेकदा तासन्तास वीज खंडित राहते आणि त्याचा फटका विद्यार्थ्यांपासून ते शेतकरी, लघु उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. त्यामुळे अशा समस्येकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष द्यावे, तळेगाव उपकेंद्रावर नियमित कनिष्ठ अभियंता नेमावा, संपर्कासाठी दूरध्वनी सेवा उपलब्ध करावी, वीज अलर्ट यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करावी, अशी ग्रामस्थांनी जोरदार मागणी केली आहे.