जळगावातील कंजरभाट समाज युवा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसह प्रतिनिधींचा समावेश
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
भांतु समाजाच्या आध्यात्मिक आणि सामाजिक उन्नतीसाठी झटणाऱ्या भांतु समाज सेवा ट्रस्ट (रजि. क्र. १२९७/२०१८) यांच्यावतीने हरिद्वार येथे “भांतु भवन” धर्मशाळेच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी, ११ आणि शनिवारी, १२ जुलै रोजी केले आहे. अशा महत्त्वपूर्ण कार्याची प्रेरणा प.पू. महात्मा रोशन महाराज यांच्यामुळे मिळाली आहे. त्यांच्या आशिर्वादाने भव्य उपक्रम प्रत्यक्षात येत आहे. भूमीपूजन सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. विशेषतः जळगाव येथून कंजरभाट समाज युवा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसह प्रतिनिधी गुरुवारी, १० जुलै रोजी दुपारी १२ वाजता हरिद्वारकडे रवाना झाले आहेत.
भूमिपूजन सोहळ्यासाठी जळगावसह पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, इचलकरंजी, नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर आदी भागातील समाजबांधव उत्साहाने सहभागी होणार आहे. हे भूमिपूजन एक ऐतिहासिक आणि एकत्रिकरण घडविणारे पर्व ठरणार आहे. ट्रस्टने आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी बांधवांनी शिस्तीसह शिष्टाचार पाळावा, असे आवाहन ट्रस्टच्यावतीने केले आहे.