९ तरुणांवर कारवाई, २५ तरुणांना समज देवून सोडले
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शाळांसह महाविद्यालय परिसरातील विद्यार्थिनी आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी जळगाव पोलिसांनी पुन्हा एकदा ठोस आणि जनहितकारी पावले उचलली आहेत. दामिनी पथकाच्या माध्यमातून जळगाव शहरातील शाळा-महाविद्यालय परिसरात गस्त वाढविली आहे. टवाळखोरी करणाऱ्या व छेडछाड करणाऱ्या मुलांवर पोलिसांकडून तात्काळ आणि प्रभावी कारवाई करण्यात येत आहे. अशातच दामिनी पथकातील पोलीस अंमलदारांनी त्वरित कारवाई करत ९ तरुणांवर कारवाई केली. २५ तरुणांना समज देवून सोडण्यात आले. दामिनी पथकाच्या कारवाईमुळे परिसरातील पालकांसह विद्यार्थिनींमध्ये एक सकारात्मक व सुरक्षिततेच्या भावनांचा जागर झाला आहे. पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यासाठी प्रत्येक पो.स्टे.मधून २ पुरुषांसह १ महिला अंमलदार अशा १२ पुरुष अंमलदार आणि ६ महिला अंमलदारांची नियुक्ती केली आहे. शाळेसह महाविद्यालय परिसरात शाळा सुरु व सुटण्याच्या वेळेला नियमित गस्त घालण्यात येत आहे. अशातच बुधवारी, ९ जुलै रोजी दामिनी पथक गस्त घालत असतांना मेहरुण तलाव परिसरातील सेंट टेरेसा स्कुल, ज्युनियर कॉलेज, नूतन मराठा कॉलेज, एम.जे. कॉलेज परिसर, बेंडाळे कॉलेज, का.ऊ. कोल्हे विद्यालय व कॉलेज, खुबचंद सागरमल विद्यालय समोर काही तरुण हे विनाकारण शाळेच्या गेटसमोर थांबुन विद्यार्थिनींना पाहुन अश्लील वर्तन करत होते. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
यांनी राबविली मोहीम
ही मोहीम पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव उपविभागातील सर्व पो.स्टे.चे प्रभारी अधिकारी, दामिनी पथकातील पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्याकडून यशस्वी राबविली जात आहे.