माजी महापौर जयश्रीताई महाजन यांनी केले पालखीचे पूजन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील मेहरुणमधील रामेश्वर कॉलनीतील किड्स झोन प्रि-स्कुल, राज प्राथमिक-माध्यमिक, डॉ. सुनील महाजन ज्युनिअर कॉलेजमध्ये आषाढी एकादशीनिमित्त रविवारी, ६ जुलै रोजी ‘पंढरीची वारी’ साजरी करण्यात आली. सुरुवातीला माजी महापौर जयश्रीताई महाजन यांनी पालखीचे पूजन केले. त्यानंतर शालेय परिसरातून टाळ, मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांसह दिंडी काढण्यात आली. तसेच भक्तीगीतांसह भजन गायनाने शालेय परिसराचे वातावरण भक्तीमय झाले होते.
वारकरी सांप्रदायिक महोत्सवाचे त्या माध्यमातून महत्त्व विशद करण्यात आले. यावेळी विठ्ठल-रूख्मिणी, संतांच्या आकर्षक वेशभूषा धारण करून शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. चिमुकल्या बालगोपाळांनी विठ्ठल नामाचा जप करत संपूर्ण परिसर भक्तीमय केला. विठ्ठल नामाच्या जपाबरोबरच विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाविषयी जनजागृती केली. विद्यार्थ्यांनी फुगड्या खेळून आषाढी एकादशीचा आनंद घेतला.
यांनी घेतले परिश्रम
दिंडीसाठी मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वीतेसाठी विकास नेहेते, प्रफुल्ल नेहेते, विजय चौधरी, ज्ञानचंद बऱ्हाटे, केतन बऱ्हाटे, संदीप खंडारे, सुशील सुरवाडे, सरोज पाटील यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिकांसह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.