मागण्यासंदर्भात योग्य न्याय देण्याचे आयुक्तांनी दिले आश्वासन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांची कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच भेट घेऊन नाशिक विभागातील कर्मचाऱ्यांच्या असणाऱ्या विविध अडचणी समस्या संदर्भात चर्चा केली. त्यांना महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष अनिल सुरडकर यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष सुनील सोनवणे, विभागीय अध्यक्ष रावसाहेब जगताप, महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद बागुल, सल्लागार विजयकुमार मौर्य यांनी निवेदन दिले. याप्रसंगी प्रवीण गेडाम यांनी सकारात्मक चर्चा करून विभागांतर्गत कर्मचाऱ्यांच्या असणाऱ्या अडीअडचणी तसेच मागण्यासंदर्भात योग्य प्रकारे न्याय देण्याचे आश्वासन दिले.
निवेदनात मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या सरळ सेवेतील रिक्त पदांचा अनुशेष बिंदू नामावलीप्रमाणे भरण्यात यावा, ३१ डिसेंबर २०१७ ते ७ मे २०२१ या कालावधीमध्ये मागासवर्गीयांच्या पदोन्नतीबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मिळावा, मागासवर्गीय कक्षाद्वारे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा अनुशेष भरून काढण्याबाबत बिंदू नामावलीची पडताळणी केली जाते किंवा कसे पडताळणी करून अनुशेष न भरणाऱ्या अधिकारी, शैक्षणिक संस्थांवर कारवाई करण्यात यावी, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमधील अनुशेष भरण्याबाबत, लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगार सेवानिवृत्त, मयत झाल्यानंतर त्याच्या वारसास त्वरित नोकरीचा लाभ देण्याबाबत सर्व विभागांना आपल्या स्तरावरून सूचना देण्यात याव्यात, आपल्या विभागांतर्गत जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयात मागासवर्गीय कक्ष स्थापन करण्यात यावा, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात संघटनेच्या कार्यालयाकरिता एक कक्ष देण्यात यावा, शासन निर्णय ३ मार्च २०१८ नुसार दर तीन महिन्यातून कास्ट्राईब संघटनेची स्वतंत्र बैठक तथा तक्रार निवारण सभा आयोजित करण्यात यावी, पाच वर्ष एकाच विभागात पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची विभागांतर्गत बदल्या करण्यात याव्यात, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन १ एप्रिल २०२५ पासून बायोमेट्रिक व फेस रिडिंगनुसार अदा करण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणेच वेतन अदा करण्याबाबत कार्यवाही व्हावी, एकाच कार्यासनावर सलग तीन वर्ष कामकाज करत असलेल्या कर्मचाऱ्यांचे कार्यासनात बदल करण्यात यावेत, अशा विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.