१ हजार रुपयाच्या बक्षीसासह दिली पुस्तके भेट
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
येथील वाकी रस्त्यालगतच्या सम्राट अशोक नगरातील रहिवासी तसेच जळगावातील भगीरथ न्यू इंग्शिल स्कूल शाळेचा विद्यार्थी हिमांशु शरद भालेराव (सोनार) याने नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी परीक्षेच्या निकालात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन यश संपादन केले आहे. त्याने हलाखीच्या आणि प्रतिकुल परिस्थितीवर मात करत जिद्द, चिकाटी, मेहनतीच्या बळावर यश मिळविल्याबद्दल जामनेर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक, कवी तथा साहित्य सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष, अमृतयात्री डी.डी.पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीत १ हजार रुपयाचे रोख बक्षीस, अमृतयात्री पुस्तक आणि शालेय पुस्तके भेट देऊन त्याचा गौरव केला. तसेच त्याचे कौतुक करुन त्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत पुढील शिक्षणासाठी लागणाऱ्या मदतीची ग्वाही दिली. यावेळी हिमांशुने वाणिज्य क्षेत्रात शिक्षण घेऊन त्यात करीअर करणार असल्याचे मत व्यक्त केले.
यांचे लाभले मार्गदर्शन
त्याला आई सौ.रेखा भालेराव तसेच भगीरथ शाळेचे मुख्याध्यापक एस.पी. निकम, उपमुख्याध्यापक जे.एस.चौधरी, आर.डी.कोळी, श्रीमती अलका पितृभक्त, किरण पाटील, आशिष पाटील यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. तो दै. ‘साईमत’चे उपसंपादक शरद भालेराव यांचा चिरंजीव आहे. हिमांशुच्या यशाबद्दल त्याच्या कुटुंबियांसह नातेवाईक, मित्र परिवाराने त्याचे कौतुक केले आहे.