Stray Cattle Nuisance : शहाद्यात मोकाट गुरांचा उपद्रव ठरतेय डोकेदुखी

0
5

बंदोबस्तासह उपाययोजनांची नागरिकांनी केली मागणी‎

साईमत/शहादा/प्रतिनिधी :

शहरातील बस स्थानकासमोर, भगवा चौक, अहिंसा चौक अशा प्रमुख वर्दळीच्या भागासह विविध वसाहतींमध्ये मोकाट गुरांची संख्या वाढली आहे. त्यामुळे त्यांच्या कळपाजवळून जाण्याची हिंमत होत नाही. मोकाट जनावरांची बऱ्याचवेळा एकमेकांना शिंगे लावून अचानक लढाई सुरू होते.

शहादा शहरात मोकाट गुरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरात दीनदयाल नगर, प्रेस मारुती ग्राउंड, बस स्थानकासमोर, भगवा चौक, सदाशिव नगर, गरीब नवाज कॉलनी, अहिंसा चौक, मोहिदा रस्त्यासह शहरात विविध भागात अथवा रस्त्यावर कळप करून वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. शहरातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांलगत मोहिदा रस्त्यावर सायंकाळी खाद्यपदार्थांच्या गाड्या लागतात. तेथे खवय्यांची गर्दी होते. त्याचवेळी रस्त्यावर मोकाट गुरांच्या कळपात जोरदार भांडण सुरू होते. असेच एकदा भांडताना जनावरे रस्त्यालगतच्या ठेला गाडीवर जोरदार धडकल्याने तरुण व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची घटना यापूर्वी घडली आहे. अशावेळी पालिका प्रशासनाकडून काही दिवस कारवाई होते. पुन्हा स्थिती ‘जैसे थे’ होते.

गेल्या काही महिन्यांपासून तर नवीन वसाहतींमध्ये जनावरे वर्दळीचा ठिकाणी रस्त्यावर बसून वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. वसाहतीत रस्त्यावर खेळणारी लहान बालके व संध्याकाळी शतपावली करणाऱ्या ज्येष्ठांना या गुरांचा जास्त धोका आहे. रस्त्यावर गर्दीच्या वेळी ही जनावरे अचानक भांडण होऊन पळत सुटतात. त्यामुळे मोकाट जनावरांचा उपद्रव नागरिकांच्या जीवावर बेतू शकतो. अशी स्थिती असताना पालिका प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.

शहरातील मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी पालिकेचा कुकडेल भागात कोंडवाडा होता. तो बंद होऊन अनेक वर्षे लोटली. परंतु प्रत्यक्षात प्रशासनाने, लोकप्रतिनिधींनी त्यानंतर मोकाट जनावरांच्या तात्पुरत्या बंदोबस्तासाठी कोणतेही नियोजन केलेले नाही. शहरातील रस्त्यांसह वसाहतीमध्ये फिरणारी मोकाट जनावरे ही नेमकी कोणाची आहेत? याचा शोध घेत त्यांना जनावरे शेतात, खळ्यात सुरक्षित ठिकाणी बांधण्यासाठी सक्त ताकीद देण्याची मागणी होत आहे.

मोकाट जनावरांच्या मालकांना कठोर समज द्यावी

शहादा नगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. शहरात भविष्यात त्यांचा उपद्रव नागरिकांच्या जीवावर बेतू शकतो. पालिका प्रशासनाने त्याची तात्काळ दखल घ्यावी. संबंधित मोकाट जनावरांच्या मालकांना कठोर समज द्यावी, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते प्रमोद अमृतकर यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here