Navapur Taluka : जिल्हाधिकाऱ्यांनी केला नवापूर तालुक्याचा दौरा

0
11

आपत्ती व्यवस्थापनासह विविध योजनांचा घेतला आढावा

साईमत/नवापूर/प्रतिनिधी :

नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांनी नवापूर तालुक्याचा दौरा करत आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने तालुकास्तरीय आढावा बैठक घेतली. बैठकीला पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. उपस्थित होते.

नवापूर येथील तहसील कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत मान्सूनपूर्व तयारी, संभाव्य पूरस्थिती आणि आवश्यक उपाययोजनांबाबत संबंधित विभागांना सूचना दिल्या. विशेषतः रंगावली व इतर नद्यांना पूर आल्यास निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर प्रभावी नियंत्रणासाठी योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश दिले. सर्व गावांमध्ये ‘आपदा मित्र’ तयार करून त्यांना आपत्ती काळात कृतीशील राहण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. याशिवाय, जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचाही आढावा घेतला.

स्थानिक वनपट्टे धारकांशी साधला संवाद

नवापूर एमआयडीसी येथील विविध प्रकल्पांना जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी भेट देऊन पाहणी केली. कामोद येथे वनपट्टे मोजणीसंदर्भात प्रत्यक्ष पाहणी करून मोजणी विभागाच्या अधिकाऱ्यांसह चर्चा केली. स्थानिक वनपट्टे धारकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. यावेळी तहसीलदार दत्तात्रय जाधव, मुख्याधिकारी डॉ. मयूर पाटील यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. संपूर्ण दौऱ्यात महसूल, पोलीस, पंचायत समिती, इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here