बोदवड : प्रतिनिधी
तालुक्यातील जलचक्र शिवारातून अज्ञात चोरट्यांनी एका शेतामधील १४ हजार रुपये किंमतीची पानबुडी मोटरसह केबल चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बोदवड पोलीसात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील जलचक्र परिसरातील शेतशिवारात बोदवड येथील अशोक देविदास जडे यांचे शेत आहे. त्यांच्या शेतात बोदवड पंचायत समितीकडून अनुदान तत्वावर पानबुडी मोटरसह केबल लावण्यात आले होते. सध्या शेतात कामे नसल्याने पानबुडी मोटर बाजूला काढून ठेवली होती. २७ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी पानबुडी मोटरसह केबल चोरून नेल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी बोदवड पोलीस स्थानकात जगन राऊत यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेका कालीचरण बिर्हाडे हे करीत आहेत.


