Yaha Mogi Mata Dham: देवमोगरातील याहा मोगी माता धामला ‘नव हिजारी कणी’ वाटप

0
4

आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक, धार्मिक परंपरेला बळकटी देणारा ठरला कार्यक्रम

साईमत/नवापूर/प्रतिनिधी :

तालुक्यातील विसरवाडीतील अखिल भारतीय आदिवासी रूढी परंपरा जाणीव जागृती संस्था यांच्यावतीने तिसऱ्यांदा आयोजित केलेला ‘नव हिजारी कणी वाटपाचा’ कार्यक्रम नर्मदा जिल्ह्यातील सागबारा तालुक्यातील देवमोगरा येथील याहा मोगी माता धाम येथे नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आदिवासी समाजाची कुलभक्ती, रूढी आणि परंपरा जिवंत ठेवणे होता. याप्रसंगी याहा मोगी पुजारी यांच्या हस्ते देव हिजारी पूजन करून देव कणी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेला बळकटी देणारा ठरला आहे. कुल समाजाची कुलभक्ती आणि रूढी परंपरेचा महान उद्देश टिकून राहण्यासाठी सर्व धाम, गाव प्रमुख, प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

याहा मोगी माता धाम देवमोगरा येथील मंदिर परिसरातून भव्य प्रभातफेरी काढण्यात आली. त्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. त्यानंतर याहा मोगी मातेची महापूजेस महाआरती करण्यात आली. त्यानंतर सती पती आरती करून देव कणीचे वाटप करण्यात आले. त्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. कार्यक्रमाला महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आणि राजस्थान येथून हजारो भाविकांनी उपस्थिती लावून महाप्रसादाचा लाभ घेतला.

यांनी केले मार्गदर्शन

यावेळी ‘आदिवासी रूढी परंपरा जाणीव जागृती संस्थे’चे अध्यक्ष ईश्वर गावित, प्रताप वसावे (रतनबारा), देवमोगरा मंदिर ट्रस्टचे कांती कोठारी, नानसिंग वसावा (उपप्रमुख), सोनजी वसावा (डेडीयापाडा), पुजारी उबड्या, माजी सरपंच जगदीश (देवमोगरा) यांनी आदिवासी समाजाला मार्गदर्शन केले. याप्रसंगी बाबुराव वसावे, जय गावित, प्रेमल पाडवी, कांतीलाल नाईक, अबेसिंग गावित, सुजित गावित, जयवंत गावित, विश्वनाथ गावित, देवजी सेठ यांच्यासह संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here