बसस्थानक ते नवी पेठ दरम्यान घडली घटना
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील नवीन बस स्थानक येथून नवीपेठेतील एका ज्वेलर्सच्या दुकानात येण्यासाठी ६५ वर्षीय महिला रिक्षात बसली होती. रिक्षातील एका अनोळखी महिलेने संधी साधून महिलेच्या पर्समधून २५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोतवर डल्ला मारल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
धुळे जिल्ह्यातील साक्री येथील सुशिला नगर भागात राहणाऱ्या लिलाबाई ताराचंदजी टाटीया (वय ६५) ह्या जळके येथे माहेरी आल्या होत्या. ३ जून रोजी त्या सकाळी १० वाजता बसने जळगाव स्थानकावर आल्या. गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची मंगल पोत तुटलेली असल्याने ती जोडण्यासाठी त्या त्यांची बहीण प्रेमलता चोपडा आणि वहिनी संगिता जैन यांच्यासह रिक्षाने नवीपेठेतील महावीर ज्वेलर्स येथे येण्यासाठी निघाल्या होत्या.
रिक्षातील अनोळखी महिलेवर संशय
जळगाव शहरातील बस स्टॅण्डवरील रिक्षात त्यांच्यासह एक अनोळखी महिलाही बसली होती. महावीर ज्वेलर्स येथे रिक्षामधुन उतरल्यानंतर दुकानात गेल्यावर त्यांनी पर्स पाहिल्यावर पर्सची चैन उघडी असल्याचे आढळले. पर्समधील सोन्याची पोत पाहिल्यावर त्यांना पोत सापडली नाही. यानंतर त्यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिल्यावरुन गुन्हा दाखल केला आहे.तपास हवालदार वीरेंद्र शिंदे करीत आहे.
