शहरांच्या काही? लॉजेसमध्ये चालतोय बेकायदेशीर ‘गोरखधंदा’
साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :
शहरातील काही लॉजेसमध्ये वाममार्गी गोरखधंद्यांना ऊत आला आहे. अशा प्रकारांकडे व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली बेकायदेशीर कृत्य करणारे आणि अशा प्रकाराला प्रोत्साहन देणाऱ्या हॉटेल, लॉजच्या मालकांकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची ओरड होत आहे.
पाचोरा शहरात गेल्या काही वर्षांपासून वाममार्गी आंबट शौकीन लफडेबाज जोडप्यांना बेकायदेशीर आणि आधारकार्ड वगैरेंची तपासणी न करता काही तासांसाठी राजरोसपणे खोल्या उपलब्ध करून दिल्या जात आहे. असाच काहीसा प्रकार २८ मे रोजी रोजी पाचोरा शहरातील हायवेवरील न्यू वाघ साई पॅलेस हॉटेल अॅण्ड लॉजिंग (डब्ल्यू हॉटेल) येथे घडला. या प्रकाराची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यावर दुपारच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून एक युवक व युवती अश्लील अवस्थेत रंगेहात पकडल्याने उच्चभ्रू परिसर, वस्ती भागात हा प्रकार सुरू असल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. चौकशीअंती या प्रकरणात हॉटेल चालक व मालकावर आणि दुसऱ्या एका युवतीचे बनावट आधार कार्ड वापरून दिशाभूल करणाऱ्या तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या छाप्यात जोडपे आक्षेपार्ह अवस्थेत सापडले
पाचोरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील स.पो.नि. दिनेश भदाणे, पी.एस.आय योगेश गणगे, पो.हे.कॉ. विश्वास देशमुख, संदीप राजपूत यांनी हायवेवरील ‘डब्ल्यू’ हॉटेलमध्ये काही संशयास्पद हालचाली होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचासमक्ष छापा टाकला. तपासणीवेळी रूम क्रमांक १ मध्ये एक युवक, युवती आक्षेपार्ह स्थितीत आढळले. हॉटेलच्या प्रवेश, नोंद रजिस्टरमध्ये अपूर्ण माहिती आढळली. ग्राहकांची ओळख पटवणारे कोणतेही अधिकृत ओळखपत्र आढळून आले नाही.
हॉटेल – लॉज मालकावर गुन्हा दाखल
या प्रकरणात हॉटेलचे चालक वाल्मीक बाळकृष्ण बोरसे (वय ३७, रा. कालिकामाता नगर, पाचोरा) आणि मालक अजिंक्य संजय वाघ (वय ३५, रा. कोंडवाडा गल्ली, पाचोरा) यांनी हॉटेल- लॉज परवान्यातील अटी व शर्तींचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२९, १३१(AA) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पी.आय.अशोक पवार यांचे आवाहन
हॉटेल लॉजच्या चालकांनी येणारे ग्राहक किंवा अन्य जोडप्यांचे अधिकृत कागदपत्रे तपासूनच त्यांना प्रवेश द्यावा, जेणे करून अशा प्रकारातून सामाजिक तेढ आणि वाद निर्माण होणार नाही, त्याची काळजी घ्यावी. बेकायदेशीर आणि शहराच्या शांततेला धोका निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आवाहन पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी केले आहे.