पंचाळाला कवी महेंद्र ताजणे मान्यवरांकडून पुरस्काराने सन्मानित
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
येथील स्मृतीशेष चमेली भाऊराव हिंगोणेकर साहित्य प्रतिष्ठानच्यावतीने स्मृतीशेष चमेली भाऊराव काव्य आणि कादंबरी राज्य पुरस्काराचे यंदा दुसरे वर्ष होते. यंदाचा काव्य पुरस्कार पंचाळा, वाशिम येथील कवी महेंद्र ताजणे यांच्या काॅपर काॅईन, नवी दिल्ली प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या “खूप काही आणखी” ह्या काव्यसंग्रहास तर गुहाघर, रत्नागिरी येथील प्रा.बाळासाहेब लबडे यांच्या जळगाव येथील अथर्व पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेल्या “चिंबोरे युद्ध” कादंबरीस जाहीर केला होता. प्रतिष्ठानतर्फे ‘पुरस्कार आपले दारी’ अशा अभिनव उपक्रमाने पुरस्काराचे वितरण कवी, कादंबरीकार यांच्या घरी जाऊन करण्यात आले. त्यात यंदाचा कवितेचा पुरस्कार कवी महेंद्र ताजणे यांच्या पंचाळा गावातील घरासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज मंदीर येथे ज्येष्ठ कादंबरीकार बाबाराव मुसळे यांच्या हस्ते नुकताच प्रदान करुन त्यांना सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी भारतीय दलित पॅंथरचे संस्थापक-सदस्य गोवर्धन चोथमल होते.
याप्रसंगी पुरस्काराचे संयोजक शशिकांत हिंगोणेकर यांनी पुरस्कारासंदर्भाची पार्श्वभूमी सांगून निवड प्रक्रिया स्पष्ट केली. याप्रसंगी कवी शेषराव धांडे, अनिल कांबळे, बाबाराव मुसळे यांनी मनोगतात कवी महेंद्र ताजणे यांचे कौतुक केले. तसेच ताजणे हे निश्चितच मराठी कवितेला संजीवकता प्रदान करणारी कविता दीर्घकाळ लिहतील, असा विश्वास व्यक्त केला.
मानवी मूल्य जोपासणाऱ्या कविता
दलित पँथरच्या चळवळीने नामदेव ढसाळांच्या रूपात आंबेडकरी साहित्याला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. महेंद्र ताजणे यांची कविता मानवी मूल्य जोपासणारी ठरणारी आहे. ती समस्त शोषित पीडित समाजाच्या वेदनेला अर्थ प्रदान करणारी निश्चितच असल्याचा ठाम विश्वास अध्यक्षीय मनोगतात गोवर्धन चोथमल यांनी व्यक्त केला. पुरस्कार वितरण प्रसंगी वाशिमचे समाजसेवक अनंतकुमार जुमडे, सरकार इंगोले, सुभाष अंभोरे, प्रवीण पट्टेबहादुर, राजकुमार पडघान यांच्यासह सर्व कुटुंब, समाजबांधव उपस्थित होते. सुत्रसंचलन मुंबई येथील सुभाष अंभोरे यांनी केले.
