रोकडसह दागिन्यांचा समावेश, चौघा चोरट्यांपैकी एकाला अटक
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जळगाव रेल्वे स्थानकात कर्नाटक एक्सप्रेसमधून उतरताना अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या बॅगेतून २ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना १५ मे रोजी दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी तपास सुरू करत मनमाडला एका चोरट्याला अटक केली तर अन्य तीन चोरटे फरार असल्याचे सांगण्यात आले.
सविस्तर असे की, लक्ष्मी विशाल अग्रवाल (वय ४०, रा. खंडवा, मध्यप्रदेश) ह्या मुलगी अवनी आणि मुलगा समर्थ यांच्यासह खंडव्याहून जळगावला येत होत्या. मुलीच्या बारावीच्या यशानिमित्त सोन्याचे टॉप घेण्यासाठी त्यांनी रोख रक्कम आणि सोन्याच्या बांगड्या बॅगेत ठेवल्या होत्या. जळगाव रेल्वे स्थानकाजवळ पोहोचताच काही चोरट्यांनी त्यांना “आमच्याकडे सामान जास्त आहे, तुम्ही आधी उतरा” असे सांगितले. रेल्वे थांबल्यानंतर लक्ष्मी अग्रवाल ह्या बॅग आणि मुलांसह उतरल्या.तेव्हा चोरटे त्यांच्या बॅगेजवळ उभे होते. खाली उतरल्यानंतर बॅग तपासल्यावर रोख रक्कम आणि सोन्याच्या बांगड्या लंपास झाल्याचे आढळून आले. त्यात ६० हजारांची रोख रक्कम आणि २५ ग्रॅमच्या सोन्याच्या बांगड्या (किंमत २ लाख रुपये) यांचा समावेश आहे. त्यानंतर लक्ष्मी अग्रवाल यांनी तातडीने जळगाव लोहमार्ग पोलिसांत तक्रार दिल्यावरुन गुन्हा दाखल केला आहे.
