जळगाव शहर पोलिसात अज्ञात चालकाविरुध्द गुन्हा दाखल
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील गेंदालाल मिल जवळील रस्ता ओलांडत असतांना एका भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा उपचारावेळी मृत्यू झाला. ईश्वर बबन पाटील (रा. गेंदालाल मिल) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी ९ मे रोजी दुपारी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ईश्वर बबन पाटील आणि त्यांचे मित्र नरेंद्र मनोहर मिस्त्री (रा. गेंदालाल मिल) हे दोघे ७ मे रोजी रात्री साडे आठ वाजता गेंदालाल मिलजवळील रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी रेल्वे उड्डाणपुलावरून भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात दुचाकीस्वाराने पुढे चालणाऱ्या ईश्वर पाटील यांना जोरदार धडक दिली. त्यांना तातडीने एका खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते. मात्र, त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
दुचाकी वाहनचालकाचा निष्काळजीपणामुळे पादचाऱ्याचा बळी
याप्रकरणी नरेंद्र मिस्त्री यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ९ मे रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यू ओढावल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस कॉन्स्टेबल फकीरा रंधे करत आहेत.