रोहयोच्या कामांसह घनकचरा डेपोचीही केली पाहणी
साईमत/नवापूर/प्रतिनिधी :
नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मित्ताली सेठी ह्या बुधवारी नवापूर दौऱ्यावर असताना नगर परिषदेच्या कार्यालयीन कामकाजाची आढावा बैठक घेतली. गेल्या महिन्याभरापासून घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची प्रसार माध्यमातून माहिती मिळाल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी नवापूर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेऊन घनकचरा व्यवस्थापन डेपोचीही पाहणी केली. यावेळी नवापुरचे तहसीलदार दत्तात्रय जाधव, मुख्याधिकारी मयूर पाटील उपस्थित होते.
नवापूर येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश येवले यांनी घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराच्या पुराव्यासह जिल्हाधिकारी कार्यालय तसेच लोकशाही दिनात तक्रारी दाखल केल्या होत्या. त्याचीच दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी घनकचरा डेपोची पाहणी करत आढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांची कान उघाडणी केली. ठेकेदाराला कोणत्या आधारे बिले अदा केली आहेत.त्याचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना मुख्याधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांकडून घनकचरा व्यवस्थापन ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यावर काय कारवाई होईल, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहणार आहे.
मजुरांच्या जाणून घेतल्या अडचणी
जिल्हाधिकाऱ्यांनी नवापूर नगरपालिकेला भेट देत अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. कचरा संकलन डेपोची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांना स्वच्छता व व्यवस्थापन सुधारण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या. यावेळी नवापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मयूर पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी रोजगार हमी योजनेची तसेच चिंचपाडा येथील वनविभागाच्या रोपवाटिकेची पाहणी केली. यावेळी मजुरांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. कामाच्या गुणवत्तेवर समाधान व्यक्त केले. भेटीवेळी तहसीलदार दत्तात्रय जाधव, वन विभागाचे अधिकाऱ्यांसह कर्मचारी उपस्थित होते.
प्रशासन पारदर्शक, गतिमानसह लोकाभिमुखतेवर दिला भर
प्रशासनात पारदर्शक आणि गतिमानता जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्याद्वारे विविध विभागांच्या कामांची थेट पाहणी करत प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख करण्यावर भर त्यांनी दिल्याचे स्पष्ट झाल्याचे दिसून आले.