अवकाळी पावसामुळे नागरिकांची उडाली एकच धांदल
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरात मंगळवारी, ६ मे रोजी दुपारी अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला, तर काही ठिकाणी गारांचा पाऊस पडल्याने एकच खळबळ उडाली. हवामान विभागाने यापूर्वीच जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार मंगळवारी दुपारी जळगाव शहरात अचानक वातावरण बदलले आणि जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. शहरातील काही भागांमध्ये तर गारांचा पाऊस पडला होता. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे नागरिकांची एकच धांदल उडाली.
भाजीपाल्याचे नुकसान होण्याची भीती
अवकाळी पावसाचा फटका ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः उन्हाळी पिकांचे आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. जळगावात दुपारच्या वेळी अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला होता. उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसून आले.