साईमत जळगाव प्रतिनिधी
राज्याच्या अर्थसंकल्पात शेती, शेतकरी आणि महिलांसाठी भरीव तरतुदी करून त्यांना बळ देणारे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच मराठी भाषेच्या जतनासाठी आणि गौरवासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली असून, यामुळे मराठी अस्मिता अधिक बळकट होणार असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नमूद केले.
मराठी भाषेचा सन्मान – ‘प्रेरणा गीत’ पुरस्काराची घोषणा
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर तिच्या सन्मानासाठी राज्य शासनाने दरवर्षी एका प्रेरणादायी गीताला ‘छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार’ जाहीर केला आहे. या निर्णयाचे स्वागत करताना पालकमंत्री पाटील म्हणाले, “मराठी अस्मितेचा अभिमान वाढविणारा हा निर्णय सर्व मराठी भाषिकांसाठी गौरवाचा आहे.”
पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागासाठी 3,875 कोटींची तरतूद
राज्यातील नागरिकांना दर्जेदार पाणी पुरवठा आणि स्वच्छतेसाठी राज्य सरकारने 3,875 कोटी रुपयांचा भरीव निधी जाहीर केला आहे.
शेतीसाठी मोठ्या घोषणा – शेतकऱ्यांना दिलासा
राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध महत्त्वपूर्ण योजना जाहीर करण्यात आल्या आहेत, ज्या कृषी क्षेत्राला नवा चालना देतील.
नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प
नाशिक व जळगाव जिल्ह्यांसाठी 49,516 हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळणार.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना: 45 लाख कृषी पंपांसाठी मोफत वीजपुरवठा; 7,978 कोटी रुपयांची वीज सवलत.
राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान: पुढील दोन वर्षांसाठी 2,13,625 शेतकऱ्यांना 255 कोटींची आर्थिक मदत.
ग्रामपंचायत स्तरावर हवामान केंद्रे: गावपातळीवर हवामान अंदाज मिळावा म्हणून केंद्रे उभारण्याचा निर्णय.
सांडपाण्याचे पुनर्वापर प्रकल्प:
8,200 कोटींच्या प्रकल्पातून उद्योग व शेतीसाठी सांडपाणी पुनर्वापर.
शेतीसाठी हरित ऊर्जा– 16,000 मेगावॅट विजेचे उद्दिष्ट
शेतकऱ्यांना दिवसा विश्वासार्ह वीजपुरवठा मिळावा यासाठी सौरऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0: राज्यातील 2,779 विद्युत उपकेंद्रांसाठी सौर प्रकल्प हाती.
सौर कृषीपंपांची जलद स्थापना:
जानेवारी 2024 पासून आतापर्यंत 2,90,129 सौर कृषीपंप बसवले; सध्या दररोज 1,000 पंप बसवण्याचे काम सुरू. हे सर्व निर्णय ग्रामीण जीवनात अमुलाग्र बदल करणारे ठरणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधोरेखित केले.
प्राचीन मंदिर संवर्धन व महानुभव पंथ स्थळांचा विकास,राज्यातील प्राचीन मंदिरे आणि महानुभव पंथाच्या श्रद्धास्थानांच्या विकासासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचा फायदा जळगाव जिल्ह्यातील अनेक श्रद्धास्थानां चा विकास करण्यासाठी होणार असल्याचेही पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
“शेती, शेतकरी, महिला आणि मराठी भाषा यांच्या हितासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी निधी देऊन सरकारने आपली वचनबद्धता सिद्ध केली आहे,” असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नमूद केले.