वाहतुकीमुळे होतेय कोंडी, महामार्गावर आहेत पाच शाळा, वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी
साईमत।धानोरा, ता.चोपडा।प्रतिनिधी ।
बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राज्य महामार्गावरील धानोरा गावाजवळ बेशिस्त वाहतुकीने विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला आहे. याच महामार्गावर पाच शाळा आहेत. त्यात तब्बल १५०० च्यावर शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत. याच ठिकाणाहून अन्यत्र शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थीही ३०० च्यावर आहेत. यामुळे बेशिस्त वाहतुकीस लगाम लागावी, यासाठी कायम स्वरूपी वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी पालकांनी केली आहे.
धानोरा हे गाव बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राज्य महामार्गावर वसलेले आहे तर याच ठिकाणी खुले बसस्थानक आहे. येथूनच जळगाव-चोपडा-यावल त्रिफुली आहे. यामुळे तिन्ही ठिकाणी खुल्या बस्थानकावर बसची वाट पाहत प्रवाशांसह विद्यार्थी उभे असतात. याचवेळी महामार्गावरील शाळा देखील भरतात व सुटतात. यामुळे विद्यार्थ्यांची गर्दी निर्माण होत असते. गर्दीतून अनेक विद्यार्थी वाट काढून जातात तर बेशिस्त वाहतुकीमुळे वाहनाच्या अचानक रांगा लागत असतात. या सर्व प्रकारामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते. तसेच वायू प्रदूषण ही मोठ्या प्रमाणात होत असते.
सकाळी व सायंकाळी या भागात असलेल्या जि.प.मराठी शाळा व झि.तो. महाजन शाळा व ना.भा.पाटील ज्युनियर कॉलेज मधील विद्यार्थी घरी जात असताना त्यांना आपला जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागतो तर बसची वाट पाहत उभे असलेले विद्यार्थी यांना बेशिस्त वाहतुकीचा सामना करावा लावतो. त्यामुळे पोलिसांनी येथे निर्माण झालेली समस्या कायमस्वरूपी निकाली काढावी, अशी मागणी केली आहे.
अपघातास आमंत्रण
त्रिफुलीवर तसेच बसस्थानक परिसरात कुठेही चांगले असे गतिरोधक नाही. यामुळे वाहने जोरात व सुसाट जातात. याठिकाणी रस्त्यावरच टपऱ्या दुकाने आहेत. यावरही अनेक ग्राहक रस्त्यावरच आपली वाहने लावून अन्यत्र फिरतात. यामुळे तिन्ही बाजूमधून कधी कोणते वाहन येईल आणि आपणास धडक देइल हे सांगता येत नाही. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वाहतुकीची कोंडी होण्याची वेळ
महामार्गावर वाहतुकीची कोंडी दिवसभरात अनेकदा होत असते. त्यात प्रामुख्याने सकाळी ८ ते ११ व सायंळी ४ ते ६ यावेळी सर्व मार्गावर कोंडी होत असते तर दर गुरुवारी येथे आठवडे बाजार भरत असतो. यामुळे संध्याकाळी या भागात जोरदार कोंडी होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होत असतो.
बस चालकांची मनमानी
या त्रिफुलीवर जळगाव, यावल, चोपडा अशा तिन्ही रस्त्यावर दिवसभर बस ये-जा करतात. यात काही बसचालक हे बस स्थानकात न उभी करता काही वेळा अगोदर तर काही वेळा पुढे उभी करत असतात यामुळे विद्यार्थी महिला आबालवृद्ध यांना बस पकडण्यासाठी पळापळ करावी लागते. यातून अनेकदा वादावादी ही झालेली आहे. यामुळे बस चालकांवर वरिष्ठ अधिकारी यांचाही अंकुश पाहिजे.
टपऱ्यांवर रोडरोमिओंचा घोळका
शाळा भरण्याच्या अगोदर व सुट्याण्याच्या वेळेला तसेच बस्थानक या भागातील काही टपऱ्यांवर रोडरोमिओ यांचा घोळका नेहमी मोटारसायकल उभी करून नाहक उभी असतात यांच्यावरही पोलिसांचा धाक नसल्याने हो घोळका करतात तसेच मोठ्या कर्कश आवाजाची बुलेट सवारी मारून हवा करण्याचा प्रयत्न करतात.
बेशिस्त वाहतूक ही या भागातील मोठी समस्या बनत चालली आहे या ठिकाणी कुठेही वाहन लावून अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
-प्रशांत सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते, धानोरा, ता.चोपडा