भगीरथ शाळेत आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक भास्करराव चव्हाण यांचे प्रतिपादन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
‘वाचा साने गुरुजींचे लेखन, घडेल तुमचे आदर्श जीवन’ असा सुंदर संदेश ज्येष्ठ साहित्यिक भास्करराव चव्हाण यांनी कथाकथन प्रसंगी विद्यार्थ्यांना दिला. कै. सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ शाळेत साने गुरुजी कथाकथनाच्या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. साने गुरुजी कथामालेचे दुसरे पुष्प त्यांच्या हस्ते गुंफण्यात आले. यावेळी त्यांनी गुरुजींच्या जीवनातील विविध प्रसंग तसेच प्रमाणात हवे, उच्च ध्येय आणि संवेदनशीलता ह्या प्रेरणादायी व संस्कारक्षम कथा सांगितल्या. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस.पी. निकम होते.
कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजींच्या ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ प्रार्थनेने झाली. यावेळी पूज्य साने गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी पर्यवेक्षक के.आर. पाटील, साने गुरुजी कथामाला प्रमुख अशोक पारधे, आर. डी. कोळी, सुनीता पाटील, वैशाली बाविस्कर उपस्थित होते. सूत्रसंचालन किरण पाटील तर टी. टी. चौधरी यांनी आभार मानले.