चाळीसगावला मराठा महासंघातर्फे तहसिलदारांना निवेदन
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी
बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या स्नेहल विजय पाटील हिच्या वारसांना वन विभागाने आर्थिक मदत द्यावी, अशा आशयाची मागणी चाळीसगाव येथील अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने तहसिलदारांना निवेदन देऊन केली आहे. निवेदनावर अखिल भारतीय मराठा महासंघाचे खुशाल बिडे, जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले, शहराध्यक्ष नंदकिशोर पाटील, शहर उपाध्यक्ष दादा पाटील, शहर कोषाध्यक्ष विजय पाटील, तालुका उपाध्यक्ष अमोल पाटील, तालुका संघटक शेखर पाटील, शहर संघटक किरण जाधव, मोतीराम मांडोळे, पत्रकार महेश पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
गेल्या १९ नोव्हेंबर २०२४ रोजी स्नेहल विजय पाटील (रा. तांबोळे बु., ता.चाळीसगाव) ही शेतात काम करत असताना तिच्यावर बिबट्याने हल्ला केल्याने ती पळत सुटली होती. ती पळत असताना विहिरीत जाऊन पडल्याने तिचा त्यात मृत्यू झाला. स्नेहल पाटीलवर बिबट्याने हल्ला केला हे आजूबाजूच्या शेतकऱ्यांनीही बघितले आहे. परंतु वन विभागाने स्नेहल पाटीलच्या वारसांना अद्यापही कुठलीही आर्थिक मदत जाहीर केलेली नाही. बिबट्याच्या हल्ल्यात दोन युवकांचा मृत्यू झालेला आहे. त्यांना वन विभागाने आर्थिक मदत जाहीर केलेली आहे. त्यामुळे वनविभाग जाणून-बुजून अन्याय करीत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्नेहल पाटीलच्या वारसांना आर्थिक मदत जाहीर करावी, असेही निवेदनात नमूद केले आहे.