निवडणूक विश्लेषण
पराभवामुळे आठ उमेदवारांची ‘अनामत’ रक्कम आली धोक्यात
आबा सूर्यवंशी, पाचोरा (७०५८२९८११६)
विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्ष निवडणूक लढण्यासाठी विधानसभेच्या आखाड्यात उतरले होते. गेल्या २०१९ च्या पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे महायुतीचे सरकार स्थापन होणार असे भकित होते. मात्र, घडलेल्या नाट्यमय घडामोडीत एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी राजकीय वैर विसरून भाजपाचे सरकार राज्यात येवू नये म्हणून हातमिळवणी करत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळविले होते. महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्ष नांदलेही होते. मात्र, भाजपने आघाडीचे सरकार सत्तेतून पायउतार करण्यासाठी शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना जवळ करून केलेली खेळी सर्वश्रुत आहे. त्यानंतर सरकारमध्ये भाजपा-सेनेचे सरकार स्थापन झाले. दोन्ही नाट्यमय घडामोडीत व दोन्ही पक्षात फूट पडल्यानंतर यांच्यात राजकीय संघर्ष कमालीचे टोकाला गेले होते. निवडणूक जाहीर झाल्यानंतर या दोन्ही पक्षांची, नेत्यांची आणि आमदारांसाठी २०२४ ची निवडणूक प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची झाली होती. यंदाच्या निवडणुकीत आ.किशोर पाटील यांची ‘हॅटट्रिक’ सार्थक ठरली आहे. त्यांना कडव्या आव्हान देणाऱ्या विरोधकांना त्यांनी पायचित करत रोखण्यात यश मिळविले आहे. तसेच आठ उमेदवारांची पराभवामुळे ‘अनामत’ रक्कम धोक्यात आली आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत पाचोरा विधानसभा मतदार संघातून महायुतीकडून किशोर पाटील यांना उमेदवारी अपेक्षेप्रमाणे मिळाली. किशोर पाटील यांना आव्हान म्हणून त्यांची बहीण वैशाली सूर्यवंशी यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली. राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले होते. राज्यात महायुती असली तरी आमदारांचे कट्टर विरोधक भाजपाचे पदाधिकारी अमोल शिंदे यांनी दुसऱ्यांदा पक्ष आदेश धुडकावून बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी केली. त्यामुळे मतदारसंघांत सुरुवातीपासून चौरंगी लढत होणार असे चित्र होते. प्रचारात तसे दिसूनही आले.
आ.किशोर पाटील यांना विरोधकांचे कडवे आव्हान
मतदारसंघात दोन वेळा आमदार पद भूषविलेले आ. किशोर पाटील यांच्यासाठी २०२४ ची विधानसभा निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची होती. त्यांनी मतदार संघात केलेल्या तीन हजार कोटींच्या विकासकामांच्या जोरावर मी निवडणूक जिंकून ‘हॅटट्रिक’ करणार असा त्यांचा दावा होता. निवडणुकीत तीन उमेदवारांच्या व्यतिरिक्त आमदारांना आणखी आठ उमेदवारांचा निवडणुकीत सामना करावा लागला. ते फारसे दखलपात्र ठरणारे नव्हते. सर्वांच्या रडारवर एकमेव आ. किशोर पाटील हेच लक्ष होते. प्रचंड चुरस निवडणुकीत बघायला मिळाली. प्रचारात आ. पाटील यांना तसा प्रत्यय आला होता. मतदानात आ. किशोर पाटील यांनी विरोधकांचे आव्हान पेलून शेवटी विजय मिळविला आणि मागील ७७ हजार ५०० चा विजयाचा रेकॉर्ड मोडून आ.किशोर पाटील यांना ९६ हजार ९७७ मते मिळाली. त्यांनी विरोधकांवर मात करत ३८ हजार ३८८ मतांची आघाडी घेतली आहे.
मविआच्या वैशाली सूर्यवंशी यांची
विजयाची झुंज ठरली ‘अयशस्वी’
महाविकास आघाडीच्या वैशाली सूर्यवंशी यांचे मोठे आव्हान किशोर पाटील यांच्या पुढे होते. त्या निवडून येतील, अशी परिस्थिती आणि चर्चा होत्या. मात्र, झालेल्या मतदानात त्यांना ५८ हजार ५८९ दोन क्रमांकाची मते मिळाली. विजय मिळविण्यासाठी त्या सर्वार्थाने सक्षम होत्या. मात्र, त्यांचे ‘मायक्रो’ नियोजन नेमके कुठे चुकले, त्याचा अभ्यास त्यांना करावा लागणार आहे. त्यांची आमदारकीची ही पहिलीच निवडणूक होती. बहुतेक राजकीय डावपेच खेळण्याचा त्यांना फारसा अनुभव नसावा. निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचा बोलबाला आणि सकारात्मक वातावरण या विश्वासावर त्या होत्या. त्यांच्या सभांना गर्दी आणि प्रतिसाद वाढत होता. कार्यकर्त्यांची मोठी फौज असतांना त्यांची विजयाची झुंज ‘अयशस्वी’ ठरली आहे.
अमोल शिंदे यांच्या मतदानात ‘घट’
अमोल शिंदे यांना विजयाची १०० टक्के विजयाची खात्री होती. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी आ.किशोर पाटील यांना कडवे आव्हान देत दोन क्रमांकाची मते मिळविली होती. एक हजार ८०० मतांच्या फरकाने त्यांचा निसटता पराभव झाल्याने यावेळी मतदार मलाच निवडून देतील, असे वातावरण त्यांनी निर्माण केले होते. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना ७५ हजार ७०० मते मिळाली होती. यावेळी झालेल्या मतदानात त्यांना तिसऱ्या नंबरवर ५७ हजार ३१३ मते मिळाली. त्यांच्या मतदानात ‘घट’ झाली आहे. यंदाच्या वेळी त्यांना फारसा अपेक्षित प्रतिसाद पक्ष, पडद्यामागील नेते यांच्याकडून मिळाल्याचे दिसून आले नाही. तसेच अर्थकारणात ते कमी पडले असावे. त्यांच्या पराभवाचे नेमके कारण त्यांच्या चिंतनाचा विषय ठरले आहे.
माजी आमदार दिलीप वाघ यांना
पाच हजार २५९ मतांवर मतदारांनी थांबविले
माजी आमदार दिलीप वाघ हे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरले होते. २००९ च्या निवडणुकीत त्यांनी माजी आ.आर.ओ तात्या पाटील यांचा पराभव करून त्यांची ‘हॅटट्रिक’ थांबविली होती. यावेळीही आ.किशोर पाटील यांची ‘हॅटट्रिक’ होवू देणार नाही, असा निश्चय करून ते निवडणूक लढले. मतदार संघांत प्रतिसाद, अपक्ष आणि अन्य समाजाचा पाठिंबा असल्याने निवडून येणार, अशी त्यांना आशा होती. मात्र, निवडणुकीत तीन ते चार उमेदवारांकडून फार मोठ्या प्रमाणात अर्थकारण होत असल्याचे त्यांनी हेरले. पैसे वाटून, अमिषे देवून मतदार विकत घेणार नाही. अनाठायी खर्च करणार नाही, अशा भूमिकेवर ते ठाम होते. तसेच शेवटच्या दोन दिवसात ते कुणाला तरी मॅनेज झाल्याने निवडणुकीत थांबले असल्याच्या वावड्या, अफवा पसरविण्यात विरोधी यशस्वी झाले. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते सैरभैर झाले. मतदारांमध्ये संभ्रम पसरल्याने त्यांना अशा प्रतिकूल परिस्थितीत पाच हजार २५९ मतांवर मतदारांनी थांबविले.
प्रताप हरी पाटीलांचा ‘समज’ फोल ठरला !
दुसरीकडे भडगाव तालुक्यातील शिक्षण महर्षी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रताप हरी पाटील यांची पण अशीच गत झाली आहे. प्रताप पाटील मराठा कार्ड घेत आमदारकीच्या स्पर्धेत उतरले होते. मतदार संघात त्यांचा फारसा जनसंपर्क, विकासाचा पाया मजबूत नव्हता. पाहिजे तसे विविध समाजांचे सामाजिक प्रभुत्व नसलेले नेते, कार्यकर्त्यांचा तुटवडा होता. फक्त संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या आणि नात्या-गोत्याचे गणित लावून मी विजयी होईल, असा त्यांचा ‘समज’ फोल ठरला. झालेल्या मतदानातून त्यांना पाच हजार ६८८ मते पडल्याने त्यांची पण डिपॉझिट गेल्यात जमा आहे.
डॉ. नीलकंठ पाटीलही ठरले ‘अपयशी’
बहुजन समाज पार्टीचे सतीश बिऱ्हाडे यांना ५९१, अपक्ष अमित तडवी यांना ६९८, अपक्ष मांगो पगारे ४७५, अपक्ष अमोल शिंदे ७८०, अपक्ष मनोहर सनांसे ३०९, अपक्ष वैशाली सूर्यवंशी एक हजार १५ अशी मते मिळाली आहे. तसेच भडगाव तालुक्यातील पण पाचोरा शहरात वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ. नीलकंठ पाटील यांनाही अल्पावधीत आमदारकीचे डोहाळे लागले होते. ते पण आमदारकीच्या शर्यतीत समाजाच्या आणि नात्यांच्या विश्वासावर नशिब आजमावण्यासाठी उतरले होते. मात्र, त्यांना दोन्ही तालुक्यातून मतदारांची आणि नात्यांची साथ मिळाली नसल्याने ते ‘अपयशी’ ठरली. ते गोत्यात अडकल्याने त्यांच्या पारड्यात फक्त एक हजार १४६ मते पडल्याने अनामत रक्कमही गमावून बसले आहे.
आठ उमेदवारांची अनामत रक्कम होणार जप्त
निवडणुकीत उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांना झालेल्या मतदानापैकी एक चतुर्थांश मते मिळाली तरच त्यांची अनामत रक्कम वाचते, असा नियम आहे. त्यामुळे २०२४ च्या पाचोरा विधानसभा निवडणुकीत तीन उमेदवार वगळता अन्य उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होणार आहे.