भाविकांनी विष्णू, महादेवाची तुळशी, बेल वाहून केली पूजा
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
शहरातील पिंप्राळ्यातील सोनी नगरातील मनोकामना पूर्ण करणाऱ्या जागृत स्वयंभू महादेव मंदिरात गुरुवारी १४ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजता ‘हरिहर भेट’ कार्यक्रम पार पडला. महादेवाला तुळशीपत्र आणि विष्णुची सहस्त्र नावे घेऊन विष्णू देवाला बेल वाहून पूजा करण्यात आली. हरिहर भेट पूजेला विशेष महत्त्व असल्याने त्रिपुरारी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी म्हणजे कार्तिक चतुर्दशी ही ‘वैकुंठ चतुर्दशी’ म्हणून साजरी केली जाते.
चातुर्मासात विष्णू शेषावर झोपत असल्याने त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो, असे म्हणतात. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्याला कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात. या दिवशी ‘हरिहर भेट’ म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते, असे मानले जाते. या पूजेचे विशेष महत्त्व म्हणजे इतर वेळी महादेवाला बेल आणि विष्णूला तुळस वाहिली जाते.
शंकराची १०८ नावे घेऊन वाहिली तुळशी
सोनी नगरातील जागृत महादेव मंदिरात गुरुवारी चतुर्मासाची सांगता करून रात्री १२ वाजेच्या दरम्यान शंकराची १०८ नावे घेऊन तुळशी वाहून आणि विष्णूची सहस्र नावे घेऊन बेल वाहून पूजा करण्यात आली. त्यानंतर गणपती, महादेव व विष्णू भगवानची आरती करण्यात आली. यावेळी कमल पारखे, सुनीता राजपूत, माधुरी येवले, पूनम पारखे, ममता राणा, कल्याणी राजपूत, संगीता भोई, यशवंत पाटील, नारायण येवले, उदय महाले, नरेश बागडे यांच्यासह सुख अमृत नगर, गणपती नगर, सोनी नगरातील महिला व भाविक उपस्थित होते.