सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
साईमत/मलकापूर/प्रतिनिधी
तालुक्यातील विवरा शिवारात कापूस वेचणी करणाऱ्या शेतमजूर महिलांना घेऊन जात असलेली ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्याची घटना घडली. त्यात १३ शेतमजूर महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. दरम्यान, सर्व जखमींवर उपजिल्हा रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.
तालुक्यातील झोडगा येथील शेतमजूर महिलांचा एक गट विवरा येथील वासुदेव किसन भोगे यांच्या शेतात कापूस वेचण्यासाठी गेला होता. दिवसभर कापूस वेचून सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्या घराकडे परत येत होत्या. दरम्यान, विवरा येथील प्रल्हाद बोरले यांच्या शेताजवळ ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली.
अपघातात ट्रॅक्टर चालक प्रवीण वासुदेव भोगे यांच्यासह १३ अपघातातील जखमी महिलांमध्ये संगीता गजानन मोरे (वय ४०), प्रमिला शंकर वराडे (वय ६०), उषा नारायण वेरूळकर (वय ४०), राधाबाई पुंडलिक भारंबे (वय ६५), सुनंदा माणिकराव चव्हाण (वय ३०), बेबाबाई नामदेव आव्हाड (वय ६५), प्रमिला लक्ष्मण सोळंके (वय ३०), ताईबाई साहेबराव निकाळजे (वय ३०), वंदना राजेंद्र खडसे (वय ४०), सविता वैभव खडसे (वय २२), सरला गणेश भोळे (वय ३५), सुषमा शांताराम अहिरे (वय ४०), उषा रमेश निकाळजे (वय ३५) यांचा समावेश आहे.
ग्रामस्थांसह विविध मान्यवर धावले रुग्णालयात
सर्व जखमी महिलांना विवरा येथील ग्रामस्थ राजेशसिंग राजपूत, वासुदेव भोगे, बाळू भागलकर आणि अमित राजपूत यांच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि विविध मान्यवर रुग्णालयात धावले. जखमी महिलांवर डॉ. स्वाती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.