पाचपांडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, स्माईलिंग स्टोन फाउंडेशनतर्फे स्तुत्य उपक्रम
साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी
येथील पाचपांडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्माईलिंग स्टोन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाआरोग्यासह रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महाआरोग्य शिबिरात तब्बल १५० रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिरात विविध आजारांसाठी तपासणी करण्यात आली. त्यात नेत्ररोग, हृदयरोग, अस्थमा, अस्थिरोग तपासणी यासोबतच दंतचिकित्सेच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.शिबिरात विशेषतः ५० रक्तदात्यांनी रक्तदान तर ९० रुग्णांची नेत्र तपासणी केली. तपासणीदरम्यान ३८ रुग्णांची नेत्रशस्त्रक्रियेसाठी निवड केली आहे. या रुग्णांची शस्त्रक्रिया लवकरच स्माईलिंग स्टोन फाउंडेशनमार्फत केली जाणार आहे.
डोळ्यांच्या ऑपरेशनवर विशेष सवलत देण्यात आली. ज्याचा लाभ अनेक रुग्णांना मिळाला. अशा आरोग्य उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना मोठा आधार मिळाला असून स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिबिराचे आयोजन हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रवीण पाचपांडे आणि स्माईलिंग स्टोन फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता प्रवीण पाचपांडे यांच्या संकल्पनेतून केले होते.
यांचे लाभले सहकार्य
शिबिराला मोहनराव नारायणा नेत्रालय नांदुरा, भन्साली ट्रेडर्स मुक्ताईनगर, मुक्ताई सिटी स्कॅन अँड डायग्नोस्टिक सेंटर मुक्ताईनगर, संजीवनी ब्लड बँक सेंटर फैजपूर, स्माईलिंग स्टोन फाउंडेशन आणि पाचपांडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मुक्ताईनगर यांचे सहकार्य लाभले.