अलोट गर्दीच्या साक्षीने वैशाली सूर्यवंशी यांचा अर्ज दाखल, सभेला लाभली महिलांची लक्षणीय उपस्थिती

0
25

गद्दार आमदारांनी पक्ष, जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला : आदित्य ठाकरे
गद्दारी लचारीचा कलंक पुसल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : वैशाली सूर्यवंशी

साईमत/पाचोरा/प्रतिनिधी

पाचोरा – भडगाव मतदारसंघात उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे उमेदवारी घोषित झालेल्या वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी शुक्रवारी, २५ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी भूषण अहिरे यांच्याकडे अर्ज दाखल केला. राज्यातील महायुती आणि महा विकास आघाडीतील राजकिय संघर्ष पाहता आणि कोणत्याही परिस्थितीत आ.किशोर पाटील यांना पराभूत करण्यासाठी उबाठा शिवसेनेने उमेदवारी दिलेल्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या समर्थनार्थ उमेदवारी अर्जासाठी उबाठा सेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे, जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, गुलाबराव वाघ, पाचोरा संपर्क प्रमुख सुनील पाटील, महिला पदाधिकारी उबाठा सेनेचे जिल्ह्यातील प्रमुख नेते पाचोऱ्यात दाखल झाले होते. अर्ज दाखल वेळी निर्मल सिड्स उद्योग समूहाचे महाव्यवस्थापक सुरेश पाटील उपस्थित होते.

वैशालीताई सूर्यवंशी यांच्या अर्जापूर्वी जामनेर रस्त्यावरील गुरुकुल इंग्लिश स्कूल जवळच्या भव्य मैदानावर शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांच्या सभेचे आयोजन केले होते. सभेला सुमारे वीस ते बावीस हजारांच्या संख्येत जनसमुदाय तर महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

प्रास्ताविकात वैशाली सूर्यवंशी म्हणाल्या की, आपल्या आमदाराने पक्षाच्या आणि मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसून गद्दारी केली. मतदारसंघात दहशत, टक्केवारी, अन्याय, अत्याचार, लोकशाहीची हत्या होत आहे. प्रशासन हतबल झाले आहे. सेटलमेंटचे करणारे आजी – माजी आमदार राजकीय नौटंकी करून जनतेला फसवित आहे. मतदारांनी भूलथापा, अमिषाला बळी पडू नये. मी जनतेच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही. गद्दारी, लाचारीचा कलंक पुसल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मतदारसंघात स्व.तात्यांना अभिप्रेत असलेला भ्रष्टाचार, भयमुक्त, शेतकरी, बेरोजगार निर्मिती, वीज, पाणी, शेत रस्ते, सिंचन, महिला संरक्षण या विषयांना प्राधान्य देणार आहे.विकासाचा आराखडा तयार करून ठेवला असल्याचे त्या म्हणाल्या.

आदित्य ठाकरे यांनी आमदारांचा समाचार घेताना घणाघाती टिका केली. पाठीत खंजीर खुपसून आमदार सुरतला पळाले. गद्दार स्वतःला विकू शकतात ते मतदारांनाही विकतील. आमच्या अडीच वर्षाच्या सरकारने शेतकरी कर्जमुक्ती, उद्योग, बेरोजगारी, वीज, पाणी, आरोग्य, विविध जनहिताचे निर्णय घेतले. आताच्या सरकारने रोजगार देणारे सर्व उद्योग सुरतला पळविले. बेरोजगार तरुण मुलं, मुली रोजगार शोधत फिरत आहे. महायुतीत रोजगार देणाऱ्या उद्योगांची खेचाखेची सुरू आहे. महिलांना लाडकी बहिण योजनेतून पैसे देताना उपकार केले असे भासवित आहे.सरकारने दिल्ली समोर महाराष्ट्राची अस्मिता विकली आहे. मतदारांनी गद्दाराना धडा शिकविण्यासाठी वैशाली सूर्यवंशी यांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.

ढोल- ताशांच्या गजरात सभा

यावेळी गुलाबराव वाघ, माजी खासदार उन्मेष पाटील, माजी महापौर विष्णू भंगाळे आदींसह जिल्ह्यातील व मतदार संघांतील शिवसेनेचे पदाधिकारी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे, करण पवार, निलेश चौधरी, विजय डॉ .अस्मिता पाटील, शरद तायडे, डॉ.जे.सी.राजपूत, डी.आर. देशमुख, दीपक राजपूत, अरुण पाटील, रमेश बाफना, ॲड.अभय पाटील, ॲड.अविनाश भालेराव, शरद पाटील,गणेश परदेशी,रवींद्र पाटील, शंकर मारवाडी, मनोहर चौधरी, विकास वाघ, हरिभाऊ पाटील, राकेश सोनवणे, भरत खंडेलवाल आदी उपस्थित होते. सभेनंतर ढोल- ताशांच्या गजरात सभा स्थळापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकापर्यंत बैलगाडी हाकत आल्यानंतर शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळे, महात्मा फुले स्मारकाला माल्यार्पण करून वैशाली सूर्यवंशी यांनी अलोट जनसमुदायाच्या साक्षीने शक्ति प्रदर्शनात अर्ज दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here