मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांसोबत यशाचा आनंद साजरा
साईमत/मलकापूर/प्रतिनिधी
थल सेना कॅम्पवरून परतलेल्या साक्षी वानखेडेचे उत्साहात स्वागत करण्यात आले. एनसीसीत सहभागी असलेल्या प्रत्येक कॅडेटचे स्वप्न असते की, ते कर्तव्य पथावर (राजपथावर) मार्च करतील आणि यासाठी प्रजासत्ताक दिन कॅम्प अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्याचसोबत थल सेना कॅम्प (टीएससी) खूप महत्त्वाचा आहे. ज्यामध्ये ऑफ स्टॅकल, फायरिंग, जजिंग डिस्टन्स अँड फील्ड सिग्नल, मॅप रीडिंग आणि हेल्थ अँड हायजिन असे पाच महत्त्वाचे इव्हेंट असतात.
जनता कला, वाणिज्य महाविद्यालयातील ज्युनियर अंडर ऑफिसर साक्षी चंद्रकांत वानखेडे यांनी राष्ट्रीय स्तरावरील थल सेना कॅम्प (टीएससी) दिल्ली येथे फायरिंग स्पर्धेत सहभाग घेतला. साक्षीच्या यशाचा आनंद मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्यात आला. जिथे साक्षीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह मिठाईचे वाटप केले. त्यानंतर महाविद्यालयात एनसीसीच्या सहकाऱ्यांनी तिचे उत्साहात स्वागत केले.
कॉलेजमध्ये साक्षीचे स्वागत फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव आणि दोन पायलटांच्या उपस्थितीत करण्यात आले. ज्यामुळे साक्षी भावूक झाली. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी साक्षीच्या यशाबद्दल तिचे कौतुक करताना सांगितले की, या उपलब्धीमुळे येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल. प्राचार्यांनी साक्षीचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन तिचा सन्मान केला.
आपल्या भाषणात साक्षीने लेफ्टनंट प्राध्यापक वाय.एस. राजपूत यांच्या प्रेरणा आणि मार्गदर्शनाबरोबरच आपल्या पालक आणि गुरुजनांचे आशीर्वाद यशाचे कारण असल्याचे नमूद केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी साक्षीचे अभिनंदन केले.