महायुती सरकारच्या विकास कामांचा घेतला आढावा

0
5

पत्रकार परिषदेत आ.चंद्रकांत पाटील माजी मंत्री खडसेंवर ‘कडाडले’

साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी

येथे आ.चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी, १८ ऑक्टोंबर रोजी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत महायुती सरकारच्या विकास कामांचा आणि जनकल्याण योजनांचा सविस्तर आढावा घेतला. सरकारने सादर केलेल्या रिपोर्ट कार्डच्या माध्यमातून त्यांनी विविध योजनांचा उल्लेख केला. आ.एकनाथ खडसे यांच्या वृत्तीला आपला विरोध आहे. महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार आहे. तसेच मुंडोळदे ते सुलवाडी पूल करून दाखवा, असे आव्हान देणारे माझा सत्कार कधी करतील, त्याची मी वाट पाहत आहे. आमदार पाटील यांनी आमदार खडसेंचा चांगलाच समाचार घेऊन त्यांच्यावर कडाडल्याचे दिसून आले.

महायुती सरकार हे एकमेव असे सरकार आहे, जे विकास आणि कल्याण या दोन्ही घटकांना प्राधान्य देते. सर्वांगिण विकासासाठी दोन्हींचा समतोल साधणे आवश्यक आहे. जे महायुती सरकारने नेहमीच केले आहे, असे त्यांनी सांगितले. शासनाने राबविलेल्या विविध विकास योजनांची माहिती देत ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ तसेच बेरोजगारांसाठी ‘रोजगार लाडका भाऊ’ ‘मुख्यमंत्री सहायता निधी’, ‘शेतकऱ्यांना वीज माफ’ अशा अनेक कल्याणकारी योजना महायुती सरकारच्या काळात राबविण्यात आलेल्या असल्याचे आ.चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आ.चंद्रकांत पाटील यांनी खडसेंचे दुसरे नाव ‘भूलथापा’ असले पाहिजे असा टोला मारत खडसे म्हणजे एक जोक झालेले आहे. सकाळी कोणत्या पक्षात तर सायंकाळी कोणत्या पक्षात हे त्यांचे समजतच नाही. पक्षासाठी ते काम करीत नसून स्वतःच्या मुलीसाठी ते फिरत आहे. पक्षाचे ध्येय धोरणांच्या विरोधात सर्व सुरु आहे. पक्षाचे खरे काम माजी मंत्री सतीश पाटील, गुलाबराव देवकर करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तीस वर्ष विविध पदे भूषविणारे यांना बोदवडकरांची तहान भागवली नाही. ती मी पूर्ण केली.

तसेच मुक्ताईनगरसाठी ३२ कोटींची नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन नुकतेच केलेले असल्याचे सांगत खडसेंनी साखर कारखान्यात पार्टनरशिप केली होती. १५० कोटींचे कर्ज घेऊन ते सेटल केले, असा आरोप करत मधुकर सहकारी साखर कारखाना बंद पाडण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता.

मुख्यमंत्री माझे नेते, ते सांगतील तो निर्णय मान्य…

महायुती असल्याने मुक्ताईनगर विधानसभा त्या जागेवर भाजपने दावा केला आहे, असे आ.पाटील यांना पत्रकारांनी विचारल्यावर त्यांनी सांगितले की, भाजपने दावा केला हे निश्चित आहे. दावा करणे काही गैर नाही. मी पण लोकसभेच्या वेळेस दावा केला होता, असे सांगितले. मी अपक्ष आमदार जरी आहे पण शिवसेनेचे काम करीत आहे. शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून कामे केली. बाळासाहेबांचे विचार घेऊन काम केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझे नेते आहेत. ते जे सांगतील, ते मला मान्य असेल. ‘सीएम’ म्हणजे ‘कॉमन मॅन’ असे असून मुख्यमंत्री यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी आता सहज मुख्यमंत्र्यांना भेटता येते. जे दोन दिवसावर मंत्रालयात गेले नाही त्यांना हे काय समजेल, असा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही आ.पाटील यांनी टोला लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here