रंगमंचावरील अर्धा डाव सोडून जामनेरचा ‘संतोष’ देवा घरी गेला….!

0
11
रंगमंचावरील अर्धा डाव सोडून जामनेरचा ‘संतोष’ देवा घरी गेला….!-www.saimatlive.com

रंगमंचावरून घेतलेली ‘एक्झिट’ सर्वांना चटका लावणारी ठरली

जामनेर शहरात नाट्य चळवळीचा पाया रोवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे, सध्या महाराष्ट्रभर विविध शासकीय योजनेचा प्रचार, प्रसार पथनाट्याच्या माध्यमातून करत समाज प्रबोधन करणारे पथनाट्य सम्राट सर्वांचे परिचित असे संतोष सुभाष सराफ यांचा गेल्या दोन महिन्यांपूर्वी जामनेरातील वाकी रस्त्यावर घरी जात असतांना एका डंपरच्या धडकेत अपघात झाला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर जळगाव येथील खडके हॉस्पिटल येथे प्राथमिक उपचार सुरु होता. मात्र, जखमेमधील इन्फेक्शन वाढत असल्यामुळे त्यांना गिरीषभाऊ महाजन यांच्या आरोग्य सेवेच्या माध्यमातून मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटल येथे ॲडमिट केले होते. तेथे त्यांच्यावर पुढील उपचार सुरु होता. मात्र, दोन महिन्यांपासून सतत मृत्यूची झुंज देत असताना मंगळवारी, १५ ऑक्टोंबर २०२४ रोजी दुपारी एक वाजून ४० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांनी जगाचा निरोप घेवून त्यांची ‘एक्झिट’ झाली. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणींना त्याचे चाहते, मित्र परिवार, नातेवाईक, आप्तेष्ट, सर्व क्षेत्रातील मान्यवर यांच्यासाठी लेखातून मनावर दगड ठेवून उजाळा देण्याचा केलेला छोटासा प्रयत्न…..

जामनेर तालुक्यातील एक हरहुन्नरी म्हणून ‘संतोष’ हा हाडाचा कलावंत होता. जेव्हा एका ज्येष्ठ पिढीकडून नाट्य क्षेत्राच्या कार्यात खंड पडला, तेथून पुढे जामनेर शहरात नव तरुण कलावंतांची फौज उभी राहिली. तेथून पुढे १९९६ पासून संदीप पाचंगे, चंद्रकांत तायडे, गौतम जोहरे, चंद्रकांत भोईटे, रुपेश बाविस्कर, प्रवीण गावंडे, प्रवीण तायडे, संदीप पवार, विनोद लोखंडे, अमोल निकम, भूषण पाटील, शशी राठोड, किशोर राठोड, दीपक पाटील, अण्णा सुरवाडे, राजू भाई, विजय बावस्कर, आनंद भीमडे या आणि अशा अनेक नावाजलेल्या कलावंतांचा ताफा शहरात नावलौकिक मिळवू लागला. या कलावंतांना सोबत घेऊन संदीप पाचंगे या आणखी एका हाडाचा कलावंत ह्या म्होरक्याच्या माध्यमातून कलावंतांची मोट उभी राहिली. त्यात ‘संतोष’चा खूप मोठा सिंहाचा वाटा होता. जामनेरात सुरुवातीला रंगकर्मींनी त्याच्या माध्यमातून आपला कला प्रवास सुरू केला. त्यानंतर जामनेर शहरात होणाऱ्या कलाविष्कार एकांकिका स्पर्धाच्या माध्यमातून रंगमंचावर आगमन करून पुढे महाविद्यालय, विविध राज्य एकांकिका स्पर्धा तर पुढे राज्य नाट्य स्पर्धा या महाविद्यालयस्तरीय विविध नाट्य स्पर्धा, नृत्य स्पर्धा या माध्यमातून जामनेर शहराचा ठसा महाराष्ट्रभर उमविण्याचा प्रयत्न केला. त्यात ‘संतोष’ चा खूप मोलाचा वाटा होता. पुढे नोकरी व व्यवसायानिमित्त ही मंडळी जामनेर शहरात तर काही शहराबाहेर स्थिर झाले. मात्र, ‘संतोष’ ने आपल्या कलेची रंगमंचाच्या साधनेत सातत्य ठेवले.

नाटकावर जगणारा एकमेव कलावंत

‘लोकरंजन बहुउद्देशीय संस्थेच्या’ माध्यमातून शासनाच्या विविध योजना पथनाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राबविल्या. रंगकर्मी विनोद ढगे यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी या क्षेत्रात एक एक पाऊल टाकत महाराष्ट्रभर नावलौकिक मिळविला. केवळ नाटकावर जगणारा एकमेव तालुक्यातील कलावंत आणि मुख्य म्हणजे एकटा नव्हे तर सोबत आठ ते दहा कलावंतांचे नाटकावर पोट भरवणारा पोशिंदा अशी ओळख निर्माण करत हा बहुरंगी बहुआयामी, सृजनशील, मितभाषी सदा हसमुख कलावंताचा प्रवास उत्तम सुरू होता. मात्र, दैवाला काहीतरी वेगळेच मान्य होते. ‘संतोष’च्या वडीलांचे दम्याच्या आजारामुळे गेल्यावर्षीच निधन झाले होते तर आई ‘अल्झायमर’सारख्या गंभीर आजाराने त्रस्त आहेत. सध्या त्यांच्यावरही घरीच उपचार सुरु आहेत. घरात एक लहान भाऊ, बहीण, पत्नी ज्या पंचायत समितीत कार्यरत आहेत आणि चार वर्षाची चिमुकली मुलगी असा ‘संतोष’च्या पश्चात परिवार आहे.

…अखेर ‘संतोष’ची मृत्यूशी झुंज संपली

आपल्या सर्व संसाराचा गाडा हा नाटकावर चालवत असताना कधी आर्थिक तर कधी मानसिक समस्यांना तोंड देत देत व विशेष म्हणजे स्वावलंबी आयुष्य आणि ‘पॉझिटिव्ह’ विचार ठेवत आयुष्याच्या मंचावर एक-एक भूमिका लीलया रीतीने निभावत असतानाच नशिबाने डाव साधला आणि याच कामातून घरी जात असताना वाकी रोड येथे एका मोठ्या डंपरच्या धक्क्याने त्याचा अपघात घडला व तिथून त्याच्या आयुष्याची वाटचाल गंभीर अवस्थेत सुरू झाली. तरीही सातत्याने या आजाराशी मोठ्या हिमतीने झुंज देत असताना अखेर त्याने मृत्यू पुढे हात टेकले आणि मुंबईतील ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्याची प्राणज्योत मावळली.

त्याच्या ‘आठवणी’ कायम सोबत असतील…!

‘संतोष’च्या निधनाच्या काही दिवसांपूर्वीच प्रसिध्द उद्योगपती रतन टाटा यांच्यावरही तेथे उपचार सुरू होते. अर्थात एका मोठ्या श्रीमंत व्यक्तीच्या सोबत मनाने विचाराने श्रीमंत असलेल्या ‘संतोष’लाही यमाने गाठलेच. सर्वांचे मनोरंजन करणारा…. हसविणारा… रंगमंचावर अर्धा डाव सोडून देवा घरी गेला….!
अखेर आपल्या ‘संतोष’ने त्याच्या आयुष्याच्या रंगमंचावरून घेतलेली ‘एक्झिट’ सर्वांना चटका लावणारी ठरली आहे. आपला ‘संतोष’ आता कुठेच दिसणार नाही…बस्स…. त्याच्या ‘आठवणी’ कायम सोबत असतील, एवढे मात्र नक्की…!

जामनेरात ‘संतोष’च्या नावाने कायमस्वरूपी कलाकृतीची रसिकांनी दिली एकमुखी हाक

‘संतोष’च्या अंत्यसंस्कारावेळी बुधवारी, १६ ऑक्टोबर रोजी विविध समाज, नाट्य उपक्रमातील सहभागी नागरिक, कलावंत, सोनार समाजाचे बांधव, जामनेर नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ कनिष्ठ कलावंत, विविध राजकीय पक्षांचे राजकारणी मंडळी, लोकप्रतिनिधी यांचा आवर्जून लक्षणीय मोठ्या संख्येने सहभाग होता. मोठ्या स्तरावर सर्वांनी शब्दसुमनांनी त्याला आदरांजली वाहिली. भविष्यात लवकरच ‘संतोष’च्या नावाने जामनेर शहरात एखादी कायमस्वरूपी कलाकृती रसिकांसाठी सुरू करण्याची एकमुखी हाक दिली. ती लवकरच पूर्ण होवो, हीच ‘संतोष’ला खरी भावांजली ठरेल, अशी अपेक्षा सर्व रसिक प्रेक्षकांनी व्यक्त केली आहे.

असे म्हणतात की, एक मित्र गेल्याने जग संपत नाही. पण हे कोणालाच समजत नाही की, लाख मित्र असले तरी त्या एकाची कमी कधी पूर्ण होऊ शकत नाही. असाच आपला सर्वांचा लाडका ‘संतोष’ होता. तो लाखातून खरा अस्सल मित्र… अजातशत्रू … होता.

शेवटी एकच सांगावेसे वाटते ते असे….

“देवाजीच्या आले मना तिथे कुणाचेच चालेना…!”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here