माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या पाठपुराव्याला यश
साईमत/मलकापूर/प्रतिनिधी
विधानसभा मतदारसंघाअंतर्गत मलकापूर, नांदुरा तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांचे मोदी आवास घरकुल योजनेचे हप्ते थांबलेले असल्याने भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन लाभार्थ्यांच्या घरकुलांचे हप्ते तात्काळ जमा करण्याबाबत निवेदनाद्वारे मागणी केली होती.
बुलडाणा जिल्ह्यात मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत २०२३-२४ या वर्षासाठी १७ हजार ५५ एवढे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्यानुसार १७ हजार ५५ लाभार्थ्यांना मंजूरात प्रदान केली आहे. त्यापैकी एक हजार ९३५ घरकुले पूर्ण झाली आहे. १५ हजार १२० घरकुले निधीअभावी अपूर्ण आहेत. त्याचप्रमाणे मलकापूर मतदार संघातील मलकापूरला एक हजार १९५ आणि नांदुराला एक हजार ३६२ असे दोन हजार ५५७ चे उद्दिष्ट प्राप्त झाले. त्यापैकी मलकापूर व नांदुरा मिळून ९३५ घरकुले पूर्णत्वास आले आहे. एक हजार ६२२ घरकुले निधीअभावी अपूर्ण आहे. त्यांना नगदी स्वरुपात मिळणाऱ्या एक लाख २० हजारपैकी १५ हजार रुपये एवढीच रक्कम आतापर्यंत सर्व घरकुल लाभार्थ्यांना मिळालेली आहे. उर्वरित रक्कम गत सहा महिन्यांपासून मिळालेली नाही. त्यामुळे घरकुल धारकांचा संसार उघड्यावर पडला होता.
उपमुख्यमंत्र्यांनी निवेदनाची घेतली तात्काळ दखल
मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत २०२३-२४ मधील मलकापूर मतदार संघातील मलकापूर, नांदुरा तालुक्यातील लाभार्थ्यांचे थकीत हप्ते त्वरित देण्यात यावे, असे निवेदन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे’ विधानसभा प्रमुख चैनसुख संचेती यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. त्याची तात्काळ दखल घेत प्राप्त लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याबाबत उपमुख्यमंत्री यांनी यंत्रणेला आदेश निर्गमित केले होते. त्यानुसार १० ऑक्टोबरपासून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.