रावेर विधानसभेसाठी भाजप अंतर्गंत फैजपूरचे ‘सराफ’ यांचे नाव चर्चेत

0
105

प्राथमिक चर्चेतून त्यांच्या नावाला मिळतेय बळ…!

साईमत/मुंबई/का.प्र.

जळगाव जिल्ह्यातील रावेर विधानसभा मतदार संघातून भाजपची उमेदवारी मिळावी म्हणून चार जण इच्छूक असले तरी फैजपूरचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांचे नाव प्रदेशस्तरावरील काही पदाधिकाऱ्यांच्या गोटातून चर्चेत आल्याचे समोर येत आहे. पक्षाचा सामान्य कर्ता ते सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रातील एक महत्त्वाचे व्यक्तीमत्त्व म्हणून त्यांच्या नावाला प्राथमिक चर्चेतून बळ मिळत असल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या प्रदेश स्तरावरील काही पदाधिकाऱ्यांवर संभाव्य उमेदवारांच्या चाचपणीची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यातही निवडून येण्याचे ‘मेरीट’ हा देखील निकष महत्त्वाचा मानला जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील भाजप अंतर्गंत जळगाव शहर, जामनेर, भुसावळ आणि चाळीसगाव विधानसभा मतदार संघासाठी उमेदवार निश्चित करण्यासंदर्भात फारसं काही शोधाशोध करण्याची गरज वाटत नाही. किंबहुना भाजपच्या या चार जागांवरील विद्यमान आमदारांबद्दल कोणताही निगेटीव्ह अहवाल नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पण रावेर विधानसभा मतदार संघासाठी पक्षाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी कोणते निकष महत्त्वाचे आहेत, त्यादृष्टीने प्रदेश संघटन स्तरावर चाचपणी सुरु झाल्याचे सांगितले जात आहे.

तथापि, जे जे पक्षाच्या उमेदवारीसाठी दावेदारी करत आहेत. त्यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत किती प्रभावीपणे कामगिरी केली याची सविस्तर माहिती संकलित करण्याचे काम वरिष्ठ पातळीवरुन सुरु झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यात रावेर-यावल मतदार संघातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची विशेषत: ज्यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी होती, अशांनी लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी किती व कसे प्रामाणिक प्रयत्न केले. याची माहितीही घेतली जात आहे. ज्यांनी रावेरसाठी उमेदवारी मिळावी, म्हणून दावा केलेला आहे. त्यांची लोकसभा निवडणुकीतील कामगिरी ही तपासली जात आहे.

विशेषत: पक्षाने रावेर लोकसभा मतदार संघातून श्रीमती रक्षाताई खडसे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्या उमेदवारीला कुणी कुणी व कसा विरोध केला यासंदर्भातही माहिती गोळा केली जात आहे. त्यासंबंधीच्या तपशील अहवाल रुपाने तयार करण्यात येत अस ल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ज्यांनी पक्षाकडे उमेदवारीची दावेदारी केली आहे, अशांची लोकसभा निवडणुकीतील कामगिरी ही तपासली जात आहे.

पहिल्या टप्प्यातील चर्चेत सराफ पुढे

नवीन घडामोडीतून अचानक माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांच्यासंदर्भात संभाव्य उमेदवार म्हणून लक्ष वेधले गेले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील एक अनुभव संपन्न व्यक्तीमत्त्व म्हणूनही त्यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपची उमेदवारी नििश्चतपणे कुणाला दिला जाईल, हे अद्याप निश्चत नसले तरी पहिल्या टप्प्यातील चर्चेत सराफ पुढे असल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here