अमळनेरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस संत श्री सखाराम महाराजांचे नाव

0
26

राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय : मंत्री अनिल पाटील

साईमत/अमळनेर/प्रतिनिधी :

येथील पिंपळे रस्त्यावर असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस अमळनेर प्रती पंढरपूरचे श्रद्धास्थान असलेल्या प. पू . संत श्री सखाराम महाराजांचे नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत झाल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली.

संत सखाराम महाराज हे अमळनेर प्रती पंढरपूर विठ्ठल रुखमाई वाडी संस्थानचे आद्यपुरुष असून संपूर्ण महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा झेंडा हातात घेऊन फिरणारे ते एकमेव संत आहेत. महाराजांचे अमळनेर हे मुख्य स्थान असले तरी पंढरपूर पासून महाराष्ट्रभर महाराजांचे प्रस्थ असल्याने सर्वत्र त्यांचा भक्त परिवार मोठ्या प्रमाणात आहे.

सद्यस्थितीत प.पू.संत श्री प्रसाद महाराज हे सखाराम महाराजांचे गादी पुरुष असल्याने त्यांनी हा वारकरी संप्रदायाचा वारसा अखंडितपणे सुरू ठेवला आहे. अमळनेरकरांची विशेष श्रद्धा सखाराम महाराज यांच्यावर असल्याने अमळनेर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस संत सखाराम महाराजांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी मंत्री अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. ही मागणी आणि महाराजांवरील भक्तांची श्रद्धा लक्षात घेता शुक्रवारी मुंबई येथे झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचे मानले आभार

मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन भाविक भक्तांच्या भावना जोपासल्याने मंत्री अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस,ना.अजित पवार, ग्रामविकास मंत्री ना.गिरीष महाजन, पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्यासह मंत्री मंडळाचे आभार व्यक्त केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here