लोंढरी बुद्रुकच्या तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

0
35

आर्थिक विवंचनेतून संपविले जीवन, पहुर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

साईमत/पहुर, ता. जामनेर/प्रतिनिधी :

कर्जाचा वाढत जाणारा डोंगर आणि पशुपालन व्यवसायात झालेले आर्थिक नुकसान यामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या तरुण अल्पभूधारक शेतकऱ्याने आपल्या शेतातच झाडाला गळफास लावून जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना जामनेर तालुक्यातील लोंढरी बुद्रूक येथे घडली.

जीवन ज्ञानेश्वर भागवत (वय ३८)असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते सतत आर्थिक विवंचनेत होते. आर्थिक संकटावर मात व्हावी, यासाठी त्यांनी म्हैस विकत घेऊन दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यातही त्यांना यश न आल्याने त्यांनी अखेर शेतातच लिंबाच्या झाडाला गळफास लावून जीवनयात्रा संपवली.

पहूर ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल केल्यावर तेथील डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. पहूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांच्या खबरीवरून पहुर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल पाटील करीत आहेत.

दोन चिमुकल्यांचे पितृछत्र हरपले

त्यांच्या मृत्यूने पाचवीतील अनिकेत आणि सहावीतील तेजस्विनी या चिमुकल्यांचे पितृछत्र हरपले. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, लहान भाऊ, वहिनी असा परिवार आहे. घरातील कर्त्या पुरुषाच्या अकाली जाण्याने लोंढरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर शनिवारी दुपारी बारा वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here