‘जळगाव ग्रामीणवर’ राष्ट्रवादी काँग्रेस ठाम

0
29

विधानसभा निवडणूक

देवकर ‘तुतारीवरच’ लढणार अन्‌ जिंकणारच : पक्ष निरीक्षक भास्करराव काळे

साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाची जागा अमाची असून आम्ही ती मित्र पक्ष उध्दव सेनेला सोडण्याचा प्रश्नच नाही. अशी ठाम भूमिका रा.काँ.(शरद पवार गटाचे) पक्ष निरीक्षक भास्करराव काळे यांनी धरणगाव येथे पक्षाच्या सभेत जाहीर केली आहे. शुक्रवारी, ४ ऑक्टोबर रोजी रा.काँ.पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा श्री.काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यात त्यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते असून यापूर्वीही ते जळगाव ग्रामीणमधून विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. त्यामुळे जळगाव ग्रामीणची जागा आमच्यासाठी प्रतिष्ठेची असल्याचे पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

जळगाव ग्रामीण मतदार संघ जिल्ह्याच्या राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा असून शिवसेनेचे (शिंदे गट) गुलाबराव पाटील विद्यमान पालकमंत्री आहेत. त्यामुळे पाटील-देवकर यांची लढत आधीपासूनच ठरलेला विषय आहे. तथापि, महाविकास आघाडीअंतर्गंत उध्दव सेनेने जळगाव ग्रामीण हा आमचा परंपरागत मतदार संघ असून ही जागा उध्दव सेनेला मिळावी, असा आग्रह खुद्द पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी धरला आहे. ही बाब त्यांनी जाहीररित्या व्यक्त केल्याने काही वेगळेवेगळे तर्क लढविले जात आहे. उध्दव सेनेचे जळगाव ग्रामीणसाठी लक्ष्मणराव पाटील उर्फ लकी टेलर, धरणगावचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी तसेच गुलाबराव वाघ हे तीन जण इच्छूक आहेत. तथापि, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना आव्हान निर्माण करु शकेल, अशी स्थिती या तिन्ही इच्छुकांची आहे का? असा प्रश्न राजकीय निरीक्षकांमध्ये उपस्थित केला जात असतांना मधूनच असाही तर्क लढविण्यात आला की, रा.काँ.चे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी ‘तुतारी’ ऐवजी ‘मशाल’ हाती घेतली तर काय वाईट? अर्थात हा चर्चेच्या स्वरुपात प्रामुख्याने धरणगाव परिसरात उमटल्याचे सांगण्यात येत आहे. माजी मंत्री देवकर हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कट्टर समर्थक आहेत. पक्ष फुटल्यानंतर ही त्यांनी शरद पवारांची साथ सोडलेली नव्हती. याशिवाय शरद पवार गटांतर्गंत श्री.देवकर हे खान्देश भागासाठी पक्षाचे महत्त्वाचे नेते गणले जातात. अशा परिस्थितीत मित्र पक्षासाठी भूमिका बदलणे हे देवकरांच्या मूळ स्वभावातच नाही, असे त्यांच्या समर्थकात मानले जाते.

दरम्यान, शुक्रवारी धरणागावात रा.काँ.च्या बैठकीत पक्षाचे निरीक्षक यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केल्याने जागेचा गुंता सुटेल कसा? असा प्रश्न उपस्थित होतांना दिसत आहे. थोडक्यात उध्दव सेनेने जळगाव ग्रामीणचा कितीही आग्रह धरला तरी रा.काँ.पक्ष त्यासाठी राजी होईल, अशी शक्यता कमीच आहे.

देवकर अप्पाच तुल्यबळ

धरणगाव येथे झालेल्या बैठकीनंतर माध्यमांसमोर रा.काँ.चे पक्ष निरीक्षक भास्करराव काळे यांनी देवकर अप्पा ‘मशाल’ नव्हे तर ‘तुतारीवरच’ लढतील आणि जिंकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. देवकर अप्पा यांचा जळगाव ग्रामीणमध्ये नियमित संपर्क असून सर्वच समाजाच्या सुख-दु:खात ते सहभागी होतात. एवढेच नव्हे तर ग्रामीण भागातील प्रश्नही तो आपल्यापरीने सोडवतात. त्यांचा या मतदार संघावर प्रभाव असून केवळ तेच शिवसेनेचा (शिंदे सेना) पराभव करु शकतात, असा दावाही रा.काँ.कडून केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here