पाचोरा प्रशासनावर आदिवासी भिल्ल समाजाचा जनआक्रोश मोर्चा, केंद्र महायुती, महाविकास आघाडी, आमदार, माजी आमदार यांच्यावर सडकून टीका
प्रशासनाला दिले १२ मागण्यांचे निवेदन
साईमत/पाचोरा/प्रतिनिधी
एकलव्य आदिवासी संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी भडगाव रस्त्यावरील अटल मैदान ते तहसील कार्यालयावर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर वाघ, जिल्हाध्यक्ष एकनाथ अहिरे, जिल्हा संपर्क प्रमुख रोहिदास जाधव, रावेर विभाग जिल्हाध्यक्ष संजय वाघ, पाचोरा तालुकाध्यक्ष गणेश वाघ, भडगावचे तालुकाध्यक्ष कौतिक सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. जनआक्रोश मोर्चाचे रूपांतर सभेत करण्यात आले.
सभेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र, राज्य सरकार मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मतदार संघांचे आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, सह महायुती, महाविकास आघाडी सरकार या सर्वांनी आदिवासी भिल्ल समाजाची दिशाभूल करून अज्ञान ठेवले. या समाजाच्या विकासाचे कोणतेही भरीव कार्य केले नाही, ७० वर्षांपासून हा समाज मोर्चे आंदोलने करून स्मशानात गाडला जात आहे. सर्वच पक्षांचे राजकारणी जातीयवादी असून मतांसाठी भिल्ल समाजाचा वापर करीत असल्याचे शिवराळ भाषेत आरोप आणि टीका केल्या. आगामी विधानसभा उमेदवारी करणारे आमदारांना भिल्ल वस्तीत घुसू देवू नका, आमचा देव एकलव्याच्या फोटोंचा कुणी पक्ष किंवा समाजाचे दलाल वापर करीत असल्याचे दिसल्यास त्यांना सोडू नका.
जो पक्ष, नेता भिल्ल समाजाच्या विकासासाठी काम करेल त्याच्या पाठीशी आमचा समाज राहील. निवडणूक काळात समाजाने सावध रहावे. तसेच शिंदे सरकारने निवडणूक पाहून आणि धनगर समाज पश्चिम महाराष्ट्रात समाजाचे जास्त आमदार निवडून आण्ण्यासाठी धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून घोषित केलेला निर्णय आठ दिवसांत मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करू, असे नेतृत्व करणारे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर वाघ यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाषणातून केले.
अडचणी, मागण्या समजून घेत प्रांताधिकाऱ्यांनी दिला सकारात्मक प्रतिसाद
पोलीस प्रशासनाने कोणाच्याही दबावाला बळी पडून आमच्या समाजाला त्रास देण्याचा किंवा खोटे गुन्हे दाखल केल्यास त्या अधिकाऱ्याला बदलीचा रस्ता दाखविण्याचा इशारा दिला. विविध मागण्यासंदर्भात प्रांताधिकारी भूषण अहिरे यांच्या दालनात चर्चा करण्यात आली. त्यांनी भिल्ल समाजाच्या अडचणी, मागण्या समजून घेत सकारात्मक प्रतिसाद दिला. वरिष्ठ स्तरावर अहवाल सादर करण्याचे सांगितले. चर्चेनंतर प्रांताधिकारी श्री.अहिरे यांनी मोर्चास्थळी येवून मागण्यांचे निवेदन स्वीकारले. मोर्चात पाचोरा, भडगाव तालुक्यासह अन्य भागातील भिल्ल समाजाचे पुरुष, महिला, युवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अशा होत्या मागण्या
मोर्चातील प्रमुख मागण्यांमध्ये पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बुद्रुक येथील मयत योगेश शिवाजी भील याची हत्या करून इलेक्ट्रिक शॉकने मृत्यू झाला असे भासविण्यात आले. योगेश भिल्लच्या मारेकरी जातीवादी गावगुंडावर कलम ३०२ अंतर्गत व अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करावा, मयताच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्य मिळावे.
धनगर समाजाला अनु. जाती – जमातीत समावेश करू नये, भिल्ल समाजा ला ग्रा. प. हद्दितील गायरान, गावठाण वन जमिनीवर घरकुले बांधून द्यावी, भिल्ल समाजाच्या ऊसतोड, वीटभट्टी कामगारांना योजनेचा लाभ द्यावा, प्रत्येक भिल्ल वस्तीत सांस्कृतिक भवन निर्माण करावे, नगरदेवळा, म्हसास येथील भिल्ल समाजाला घरकुल मंजूर करावे, आदिवासी मासेमारी करणाऱ्यांची अडवणूक करू नये, भिल्ल समाजाच्या जातींच्या दाखल्यांसाठी जाचक अटी रद्द कराव्या,भडगाव तालुक्यातील गुढे येथील भिल्ल तरुण गिरणा नदी पात्रात वाहून गेला त्याच्या कुटुंबाला अर्थसहाय्य मिळावे, पाचोरा शहरात होणारा रावण दहन कार्यक्रम कायम स्वरुपी बंद करावा आदी मागण्यांचा समावेश होता.