भडगावला भव्य भजन गीत गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
15

९० भजनी मंडळांनी घेतला सहभाग, आज होणार बक्षीस वितरण

साईमत/भडगाव/प्रतिनिधी :

कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांच्या २३ व्या पुण्यस्मरण सप्ताह अंतर्गत, नानासाहेब श्री प्रतापराव हरी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भडगाव व पाचोरा तालुक्यातील भजनी मंडळासाठी नुकतीच भव्य भजन गीत गायन स्पर्धा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रतापराव पाटील होते.

यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालिका डॉ.पूनम पाटील उपस्थित होत्या. भजन स्पर्धेचे उद्घाटन ह.भ.प.गोविंद महाराज, पाचोरकर मठाधिपती पंढरपूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ह.भ.प.स्वप्निल महाराज, गिरडकर, संस्थेचे समन्वयक कमलेश शिंदे, विविध शाखांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. भजन गीत गायन स्पर्धेला दोन्ही तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जवळपास ९० भजनी मंडळांनी यात सहभाग नोंदवला.

विविधांगी सादरीकरणातून उपस्थित श्रोत्यांना मंडळांनी मंत्रमुग्ध केले होते. यात भजनी मंडळांनी पारंपरिक तसेच आधुनिक भजन, भारुड, गवळण, भक्तीगीते, प्रबोधनपर गीते सादर केली. ‘विधानसभेच्या तोंडावर विविध राजकीय पक्ष अनेक प्रकारचे मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करत असताना, प्रतापराव पाटील यांनी भजन गीत गायन स्पर्धा ठेवून एक सांप्रदायिक व अध्यात्मिक कार्याला मोठे बळ दिले आहे’, अशी भावना अनेकांनी बोलून दाखवली.

ह.भ.प.गोविंद महाराज पाचोरेकर यांनी कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील व प्रतापराव पाटील यांचे भडगाव तालुक्यातील विकासात मोलाचे योगदान राहिले आहे, असे गौरवोद्गार काढले. ‘सांप्रदायिक सेवा कधी वाया जात नाही’ असे मत किर्तनकार ह.भ.प.रवींद्र महाराज तारखेडेकर यांनी व्यक्त केले. परीक्षक म्हणून ह.भ.प. चंद्रकांत महाराज वारूळ, पष्टाणेकर व ह.भ.प.गोकुळ महाराज हातणेकर यांनी काम पाहिले. दोन दिवस चाललेल्या भजन स्पर्धेतून निवडक मंडळांचा सन्मान व बक्षीस वितरण समारंभ प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसाला २८ सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

भजनी मंडळाच्या सभासदांचा होणार गौरव

भजनी मंडळाच्या सभासदांचा रूमाल-टोपी, श्रीफळ, प्रमाणपत्र, मानधन देऊन गौरव करण्यात आला. स्पर्धेला सांप्रदायिक व आध्यात्मिक क्षेत्राच्या लोकांनी भेट देऊन भजन स्पर्धेच्या आयोजकांचे अभिनंदन केले. अत्यंत शिस्तबद्ध अशी ही भजन स्पर्धा झाली. यशस्वीतेसाठी किसान शिक्षण संस्थेचे विविध शाखांचे मुख्याध्यापक, प्राचार्य तसेच आयोजन समिती प्रमुख रमेश धनगर, डी.डी.भोसले, एन.एन.पाटील, संदीप पाटील यांच्यासह विविध समिती सभासदांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here