राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी उद्धव सेनेचा टार्गेट

0
18

जळगाव ग्रामीण आजमावण्याची उद्धव सेनेत जबरदस्त उर्मी…!

साईमत।जळगाव।विशेष प्रतिनिधी

विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय गणित बदलू लागले आहेत. प्राप्त माहितीनुसार महाविकास आघाडी अंतर्गंत जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघ उद्धव सेनेला हवा आहे, नव्हे राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी ते आमचे आवश्यक टार्गेटच आहे, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निश्चित केल्याचे वृत्त आहे.

तथापि, महाविकास आघाडी अंतर्गंत जळगाव जिल्ह्यातील विधानसभांच्या जागांचे अंतिम वाटप अद्याप निश्चित झालेले नसले तरी जळगाव ग्रामीणच्या जागेबाबत नवीन घडामोडी निर्णयाचा संकेत देणारी आहे. गेल्या मंगळवारी मुंबई येथे मातोश्रीवर उद्धव सेनेच्या पक्षप्रमुखांसोबत जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या बैठकीत स्वत: उध्दव ठाकरे यांनी आलेल्या पदाधिकाऱ्यांना जोरदारपणे कामाला लागा, अशा सूचना दिल्याचे सांगण्यात येत आहे. स्वत: पक्ष प्रमुखांनी जोरदार कामाला लागा, अशा सूचना दिल्याने जळगाव ग्रामीण मतदार संघातील इच्छुकांमध्ये कमालीचा उत्साह संचारला आहे. उध्दव सेनेत जळगाव ग्रामीण मतदार संघासाठी लक्ष्मणराव पाटील उर्फ लकी अण्णा (लकी टेलर), धरणगावचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी आणि गुलाबराव वाघ यांची नावे आघाडीवर आहेत.

हा खेळ हिशोबाचा…

जळगाव ग्रामीणमधून शिवसेनेचे (शिंदे सेना) विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील उमेदवार असणार आहे. तेव्हा त्यांच्याशी लढत करुन हिशोब चुकता करण्याची खुमखुमी उध्दव सेनेत दिसून येते. किंबहुना मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी निवडणूक लढविली नाही तर समाज अथवा मतदारात वेगळा संदेश जाईल, अशी मानसिकताही यासंदर्भात दिसून येत आहे. कालपर्यंत जळगाव ग्रामीणची लढत मंत्री गुलाबराव पाटील विरुध्द रा.काँ.चे (शरद पवार गट) माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यातच होईल, असे चित्र गेल्या काही महिन्यांपासून होते. मात्र, अचानक उध्दव सेनेने जळगाव ग्रामीणवर दावा केल्याने आणि खरच ही जागा आघाडी अंतर्गंत उद्धव सेनेच्या वाट्याला आल्यावर देवकर काय करतील असा प्रश्नही राजकीय निरीक्षकांमध्ये उपस्थित केला जात आहे. तर या संभाव्य बदलासंदर्भात गुलाबराव पाटील समर्थकात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राजकारणात काहीही होवू शकते, त्यामुळे राजकारणाला ‘शक्यतांचा खेळ’ म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here