आनंदाने परीक्षेला सामोरे जा : डॉ नूतन पाटील
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
अभ्यासाला जर आनंद जोडला तर तणाव बराच कमी होऊ शकतो. विद्यार्थ्यांनो अभ्यासाचे नियोजन करा. परीक्षेची भीती बाळगू नका. चिंतन, लेखन सराव करा. असा सल्ला नूतन मराठा महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागाच्या डॉ. नूतन पाटील यांनी दिला.
येथील मू जे महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील वादविवाद मंडळाद्वारे “अभ्यासातील ताण तणाव व व्यवस्थापन ” या विषयावर आयोजित व्याख्यानात त्यांनी व्याख्याता म्हणून बोलतांना अभ्यास कसा करावा? अभ्यास करताना येणारा ताण आणि त्या ताणाचे व्यवस्थापन यावर आपले विचार व्यक्त केले.
ताणाविषयी बोलताना डॉ. नूतन पाटील म्हणाल्या की, ताण आल्यास विद्यार्थी एक तर ताणापासून दूर जातो किंवा ताणाला शरणागत जातो. ताण हा दुसऱ्यांसोबत शेअर करायला शिका. त्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, पालक यांचा समन्वय होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी मनात कुठलाही न्यूनगंड बाळगू नये. त्याबरोबरच नियंत्रण कक्षेच्या बाहेर असलेल्या गोष्टी नियंत्रण कक्षेत आणण्यासाठी प्रयत्न करा. आपली बलस्थाने ओळखा. कमतरतांवर काम करा. चांगला अभ्यास करून चांगले गुण मिळवण्याची संधी जोपासा. तसेच अभ्यासात एकाग्रता आणण्यासाठी विषय समजून उमजून घ्या. आणि चर्चात्मक अभ्यास पद्धतीचा अवलंब करा. ताण विरहित परीक्षा द्या.असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. शेवटी परीक्षेपूर्वी शांत रहा आणि दीर्घ श्वसन करा. असा मौलिक संदेश त्यांनी आपल्या व्याख्यानात दिला.
यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. करुणा सपकाळे या होत्या . यावेळी पर्यवेक्षक प्रा. आर. बी. ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.श्रध्दा पाटील यांनी तर आभार प्रदर्शन वाद-विवाद मंडळ प्रमुख गणेश सूर्यवंशी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा . छाया चौधरी, प्रा. पल्लवी फिरके, प्रा. वर्षा पाटील, प्रा.ईशा वडोदकर, प्रा.अर्चना जाधव, प्रा. हेमंत पिंपळे, प्रा. पूजा सायखेडे, प्रा. उमेश ठाकरे , चेतन वाणी आदींनी परिश्रम घेतले.