स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात आपला देश, जागतिक महासत्ता होणार

0
10

रोटरी वेस्टच्या व्याख्यानात माजी खासदार पूनम महाजन यांचा विश्वास
 

साईमत / जळगाव / प्रतिनिधी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी स्वर्णिम काळात आपण असून शताब्दी वर्षात अर्थात २०४७ मध्ये आपला देश जागतिक महासत्ता होईल, असा विश्वास माजी खासदार पूनम महाजन यांनी व्यक्त केला. रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे भारत @ 2047 – संधी आणि सहभाग या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या.
व्यासपीठावर अध्यक्ष विनीत जोशी, प्रशासकीय सचिव भद्रेश शाह, प्रकल्प सचिव तुषार तोतला यांची उपस्थिती होती.

व्याख्यानात महाजन यांनी स्वातंत्र्यासाठी गुलामगिरी विरोधात नंतर औद्योगिक प्रगतीसाठी व आणीबाणी विरोधातील लोकशाहीसाठी देशाने केलेला संघर्ष कथन केला. माहिती – तंत्रज्ञान क्षेत्रातील सुरुवात व वाटचाल, पोखरणसह अंतराळ क्षेत्रात केलेली क्रांती याविषयी देखील त्यांनी माहिती दिली. वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नसतो, याबाबत मोबाईल क्रांतीसाठी  स्व. प्रमोद महाजन यांनी पाहिलेले स्वप्न हे उदाहरण सांगितले.

२०४७ साठी सर्वांना विशेषतः युवकांना खूप संधी असून सर्वांनी सकारात्मक भाव घेऊन त्यात सहभाग दिला पाहिजे. २०१४ पासून देशाच्या नेतृत्व ते सामान्य जनतेपर्यंत सर्वांच्या मनात मै नाही हम हा विकास व प्रगती विषयी आत्मविश्वास निर्माण झाला आहे, म्हणजे कुछ तो मॅजिकल हो रहा है असे महाजन यांनी सांगितले.

एआय तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढला तरी माणुसकी जिवंत राहणार आहे. विश्वाच्या परिपेक्षात आपल्याकडे असलेली लोकशाही ही सर्वात मोठी ताकद आहे असे सांगून प्रत्येक विषयात राजनीती नाही तर रणनीती महत्त्वाची असते असे त्या म्हणाल्या.
रोटरीचे सदस्य समर्पित भावनेनेच कार्य करीत असतात. त्यांच्यासारखेच सर्वांनी समर्पित भावनेने या संधीचा उपयोग घेत यात सहभाग घेऊन त्याचा उपभोग घ्यावा. ग्लोबल सिटीझन होण्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, असे आवाहन महाजन यांनी शेवटी केले.

रोटरी वेस्टचे माजी अध्यक्ष विनोद बियाणी, सुनील अग्रवाल व अनिल कांकरिया यांच्या हस्ते पुनम महाजन यांचा सत्कार करण्यात आला. परिचय भद्रेश शाह यांनी तर आभार अनिल कांकरिया यांनी मानले. शहरातील सर्व रोटरी क्लबचे पदाधिकारी व रोटरी वेस्टच्या सदस्यांची व्याख्यानास उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here