प्रियकराच्या मदतीने नणंदेने काढला भावजयीचा ‘काटा’

0
27

अमळनेर पोलिसांसह एलसीबी शाखेच्या पथकाची यशस्वी कामगिरी

साईमत।जळगाव/अमळनेर।प्रतिनिधी।

अमळनेर शहरात गांधलीपुरा भागात रविवारी महिलेचा खून झाल्याची घटना समोर आली होती. दरम्यान, संपूर्ण प्रकरणाचा छडा अमळनेर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने यशस्वीपणे लावला आहे. नगरपालिकेत अनुकंपा तत्त्वावर सासूच्या जागेवर सून लागू नये, तिच्या जागी आपणच लागावे म्हणून सुनेच्या नणंदेनेच प्रियकराच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

सविस्तर असे की, शितल जय घोगले (वय ३५, रा. मेहकर कॉलनी, गांधलीपुरा, अमळनेर) असे मयत विवाहितेचे नाव आहे. त्या पती, सासू यांच्यासह राहत होत्या. रविवारी, २२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते ११ वाजेच्या दरम्यान मेहतर कॉलनी समोर बोरी नदीच्या काठावर झुडपांमध्ये शितल घोगले यांचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपासचक्र फिरवली होती. मिळालेल्या गोपनीय माहिती व पुराव्याच्या आधारे त्यांनी शितलच्या मारेकऱ्यांना हुडकून काढले. मयत शितल घोगले हिची नणंद व तिचा प्रियकर यांना अटक केली.

तपासातून समोर आली धक्कादायक माहिती

मयत शितल घोगले यांची सासू पारोबाई परशुराम घोगले (वय ५५) या नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करतात. त्यांचा मुलगा जय हा आजारी असतो. म्हणून पारूबाई यांच्या जागी नोकरीवर त्यांची सून शितल लागेल. तिच्याऐवजी मुलगी म्हणून आपणच लागले पाहिजे, असा विचार शितल घोगले यांच्या नणंदेचा तथा पारूबाई यांची मुलगी मंगला हिचा होता. त्यातूनच हे हत्याकांड घडले. रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास शितल आणि मंगलाबाई या दोघी शौचासाठी काटेरी झुडपात गेल्या होत्या. नंतर मुलगी मंगला ही परतली. मात्र, शीतल ही दिसून आली नाही. म्हणून शोधाशोध सुरू झाल्यानंतर काटेरी झुडपात शितल ही मृत अवस्थेत आढळून आली.

दोघांनी पोलिसांना दिली गुन्ह्याची कबुली

पोलिसांना तपासामध्ये मंगला हिने ‘मी शौचाहून पाच मिनिटातच परत आली’, असे सांगितले होते. मात्र, सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर ती तब्बल २५ मिनिटांनी परत येताना दिसली आहे. तसेच तिचा प्रियकर असल्याची माहिती मिळताच तिला विचारले, ‘मी त्याच्याशी कधीपासून बोललेली नाही’ असे तिने सांगितले. मात्र, सीडीआर रिपोर्ट तपासल्यावर ती वारंवार आणि रात्री तिचा प्रियकरशी बोलत असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

यांनी केली कामगिरी यशस्वी

संशयित आरोपी मंगला घोगले हिच्यासह तिचा प्रियकर करण मोहन घटायडे (वय ३४, रा. आयोध्या नगर, बंगाली फाईल) याच्या मदतीने नणंद मंगला हिने भावजय शितलचा खून केल्याचे निष्पन्न झाले असून दोघांना अटक केली आहे. ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, एलसीबीचे निरीक्षक बबन आव्हाड, अमळनेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे तपास पूर्ण करुन केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here