दोन्ही बिबट्यांचे डीएनएचे नमुने नागपुरला प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविणार
साईमत।चाळीसगाव।प्रतिनिधी।
तालुक्यातील गणेशपूर येथे १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी वन्यप्राणी बिबट्याने कुमार अनिल नंदू मोरे (वय १४) या मुलास हल्ला करून ठार केले होते. त्यानंतर लगेच घटनास्थळी वनविभागाची टीम दाखल झाली होती. घटनास्थळी कॅमेरे बसविण्यात आले. आजूबाजूच्या गावांमध्ये जनजागृती व हल्ले टाळण्यासाठी उपाययोजना याबाबत सूचना दिल्या. मृत मुलाच्या वारसदार आई, वडील यांना १६ सप्टेंबर रोजी तात्काळ धनादेशाद्वारे १० लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आली.
जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक यांच्या अध्यक्षतेखाली वन्यप्राणी बिबट्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी समिती गठीत करण्यात आली. सर्व उपाययोजना करूनही वन्यप्राणी बिबट नैसर्गिक अधिवासात परतत नसल्याने बिबट्यास जेरबंद करणे, बेशुद्ध करण्याची शिफारस गठीत समितीने केली. त्यानंतर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा मुख्य वन्यजीव रक्षक नागपूर यांच्याकडून आदेश प्राप्त झाले. त्यानंतर वनविभागाकडून आजूबाजूच्या क्षेत्रात पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद केले. सरपंच, पोलीस पाटील व इतर गणेशपूर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत वन्यप्राणी बिबट्यास जेरबंद केलेला पिंजरा सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आला आहे.
त्यानंतर आजूबाजूच्या परिसरात अजून एक वन्यप्राणी बिबट्या असल्याची खबर मिळाली. एका शेतकऱ्याची वासरी बिबट्याने फस्त केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाने वासरी फस्त केल्याच्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावून बिबट्या असल्याची खात्री केली. बिबट्या वावर क्षेत्रात पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावून २१ सप्टेंबर रोजीच्या रात्री वन्यप्राणी बिबट्यास जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. पकडलेल्या दोन्ही बिबट्यांचे डी.एन.ए. चे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात येणार आहेत.
यांनी बजावली कामगिरी
ही कारवाई जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रवीण ए. यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत जळगाव वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अमोल पंडित, चाळीसगाव (प्रा.)चे वनपरिक्षेत्र अधिकारी शितल नगराळे यांच्यासह इतर सर्व वन कर्मचाऱ्यांंनी कामगिरी बजावली.