डझनभर नेत्यांच्या उपस्थितीत दिलीप खोडपे यांचा रा.काँ.पक्षात प्रवेश
पंढरीनाथ पाटील
जामनेर: भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे सर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. डॉ. अमोल कोल्हे, मेहबूब शेख, आ.एकनाथ खडसे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या डझनभर नेत्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळा २१ सप्टेंबर रोजी पार पडला. त्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, डी.के पाटील, सुभाष बोहरा (राजू काका), डॉ. प्रशांत पाटील, सौ.वंदना चौधरी, व्ही.पी.पाटील सर, डॉ. मनोहर पाटील यांच्या अथक प्रयत्न आणि मेहनतीने व त्यागाच्या भूमिकेमुळे खोडपे सरांचा पक्ष प्रवेश सोहळा मोठ्या थाटात पार पडला. कारण याच तालुकास्तरावरील नेत्यांचा जामनेर विधानसभा निवडणुकीत प्रमुख इच्छुकांमध्ये समावेश होता. ना. महाजन यांना त्यांच्या तालीमीतील आणि त्यांच्याच फडातील सर्वसामान्य नेता टक्कर देऊ शकतो. हे हेरून त्यांनी पक्ष हितासाठी आपले योगदान दिले, असल्याची चर्चा तालुक्यात सुरु आहे.
सरांचा पक्ष प्रवेश झाला त्यांनी ‘तुतारी’ हाती घेतली आणि प्रवेश सोहळ्याला जामनेर तालुक्यातील जनतेने भरभरून साद दिली. जमलेली गर्दी सरांसाठी जमेची बाजू दिसून आली. गर्दीमध्ये मराठा समाजातील लोकांव्यतिरिक्त इतर समाजाचे नागरिकही जातीने हजर असल्याचे दिसून आले. यावरून ही परिवर्तनाची नांदी ठरू शकते का? अशा भावना तालुक्यातील सुज्ञ नागरिक व्यक्त करतांना दिसून येत आहेत. ना.महाजन हे सतत ६ टर्म झाले तालुक्याचे प्रतिनिधीत्व करीत असल्याने त्यांना ३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. राज्य सरकारमध्ये एक वजनदार मंत्री पदाचे खाते ते सांभाळत आहेत. काहीसा तसाच अनुभव खोडपे सरांनाही आहे. कारण ना. महाजन यांच्या अगोदर ‘लाल दिव्याचा’ मान खोडपे सरांच्या रुपाने तालुक्याला मिळाला होता, हे विसरून चालणार नाही.
तालुक्यात भलेही एक छत्री सत्ता केंद्रे ना.महाजन यांच्याच ताब्यात असून तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायती भाजपच्याच ताब्यात आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती, शेतकी संघ यासह स्थानिक स्वराज्य संस्था भाजपच्याच ताब्यात आहेत. तसेच ग्रामीण भागातील बहुतेक गावांमध्ये भाजपचेच दोन गट असून विधानसभेला दोन्ही गट ना.महाजन यांनाच साद देतात, ही वस्तूस्थिती आहे. स्थानिक गाव खेड्यांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे दोन्ही गट एकमेकांविरोधात उभे ठाकलेले असतात. या दोन्ही गटांना बळ तालुका स्तरावरून पुरवले जात असल्याची खंत अगोदरच दिलीप खोडपे सरांनी व्यक्त केली आहे.
राजकारण शक्यतांचाच खेळ
‘जो जिता वही सिकंदर’ या उक्तीप्रमाणे जिंकणारा गट आपोआपच भाजप सोबतच असतो. मात्र, गाव खेड्यांच्या निवडणुकीमुळे गावागावात भांडणे लागत आहे. दोन गट एकमेकांच्या दहशतीखाली वावरतांना दिसून येतात. ही वस्तूस्थिती कोणीही नाकारू शकत नाही, असे मत तालुक्यातून जाणकार व्यक्त करतांना दिसून येतात. एकंदरीतच एक सुशिक्षित आणि सुसंस्कारित व्यक्ती म्हणून खोडपे सरांनी जी आपली ओळख व ख्याती जिल्हाभरात तयार केलेली आहे. तीच इथल्या जनतेला अपेक्षित आहे. म्हणून यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिलीप खोडपे सरांना जामनेरकर साथ देतील का? की, ना.महाजन ७ व्या टर्मला गवसणी घालतील?…. नाही तरी राजकारण हा शक्यतांचाच खेळ राहिला आहे. तेव्हा असे म्हणायला हरकत नसावी की, …. अब आयेगा ‘खेल’ का मजा…!