तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आ. एकनाथराव खडसे यांचे प्रतिपादन
साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :
शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी जीवनात खेळाचे खूप महत्त्व आहे. निकोप शरीरातच निकोप मन असते. खेळामुळे शरीर व मन दोघे स्वस्थ राहून मन व बुद्धीचा विकास होतो. खेळामुळे मनोरंजन तर होतेच. शिवाय मनाची एकाग्रता साधता येते. त्यामुळे खेळ हा विद्यार्थी जीवनातील एक महत्त्वाचा व अविभाज्य भाग आहे. निरोगी शरीरासाठी नियमित व्यायामासोबत खेळ खेळणे आवश्यक आहे. खेळांमुळे शिस्त, परिश्रम,संघभावना,नेतृत्व यासारखे गुण विकसित होऊन यशस्वी जीवनाचा पाया रोवला जातो. म्हणूनच जीवनात क्रीडा क्षेत्रात अधिकाधिक प्राविण्य मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य आ. एकनाथराव खडसे यांनी केले. निमखेडी खुर्द येथील नवीन माध्यमिक विद्यालयात शालेय क्रीडा विभाग व मुक्ताईनगर पंचायत समितीच्या शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.
यावेळी मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन ॲड.रोहिणी खडसे यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्थानिक शालेय समितीचे अध्यक्ष नारायणराव चौधरी, संस्थेचे सचिव डॉ सी.एस.चौधरी, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश राणे, संस्थेचे संचालक चंद्रशेखर बढे, रमेश खाचणे, आर.पी.बऱ्हाटे, महेश पाटील, तालुका क्रीडा मार्गदर्शक जगदीश चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी संजय ठोसर, केंद्रप्रमुख धनलाल भोई, योगेश भोसले, महेंद्र मालवेकर, तालुका क्रीडा कार्यालयाचे कर्मचारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सरस्वती पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी प्रास्ताविकातून विद्यालयाचे मुख्याध्यापक विकास चौधरी यांनी शाळेत सुरू असलेल्या भौतिक सुविधाबाबत संस्थाचालकांचे आभार व्यक्त केले. यावेळी तालुक्यातून विविध स्पर्धासाठी आलेल्या सर्व क्रीडाशिक्षकांचा व्हिसल ही छोटीशी भेटवस्तू देऊन शाळेतर्फे सत्कार करण्यात आला.
१८ शाळांनी नोंदविला सहभाग
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये १००, २००, ५०० मीटर धावणे, ४ × १०० मीटर रिले, लांबउडी, उंचउडी या स्पर्धांसाठी तालुक्यातील १८ शाळांनी सहभाग नोंदविला. यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सर्व क्रीडा शिक्षकांनी तर बी.के.महाजन, अशोक जाधव यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक ए. एन.चव्हाण यांनी केले.