सभेत रा.काँ.चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली घोषणा
साईमत/जामनेर/प्रतिनिधी
जामनेर विधानसभा मतदार संघांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ‘तुतारी’ आम्ही दिलीप खोडपे सर यांच्यात हातात दिल्याची घोषणा मी करतो, असे सांगून रा.काँ. (एस.पी.गट) ची खोडपे सरांना उमेदवारी जाहीर करण्याची उत्तर महाराष्ट्रातील ही पहिली घटना असावी.
जामनेर येथे रा.काँ.ची विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने आयोजित शिवराज्य यात्रेच्या जाहीर सभेच्या कार्यक्रमात शनिवारी, २१ सप्टेंबर रोजी ही घोषणा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. शिवराज्य यात्रेच्या निमित्त आयोजित सभेत प्रारंभी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपाचे नेते दिलीप खोडपे सर यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. त्यातच त्यांची जामनेरमधील उमेदवारीही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली.
जयंत पाटील म्हणाले की, आम्ही श्री.खोडपे सर सरळ स्वभावाचा सामान्य माणूस अशी खात्री झाल्यानंतर आणि त्यांच्या पक्ष प्रवेशासाठी लोटलेला जनसमुदाय बघता आम्ही त्यांची उमेदवारी घोषित केली आहे. आम्हास खात्री आहे. खोडपे सर महाजनांना चितपट करतील, असे सांगून खोडपे सरांना शक्ती देण्याची जबाबदारी आमदार एकनाथराव खडसे निश्चितपणे करतील आणि आजपासून श्री.खडसे पक्षात सक्रीय झाल्याचेही त्यांनी जाहीर केले.
मी राष्ट्रवादी पक्ष सोडलेलाच नव्हता : आ.खडसे
सभेत आ.एकनाथ खडसे यांनीही मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधीच सोडलेला नव्हता. तसेच भाजपमध्ये प्रवेश द्या, असेही म्हटले नव्हते, असे सांगून खडसे नेमके कुठे या शंकेला पूर्ण विराम दिला. श्री. खडसे यांनी आपल्या भाषणात जामनेर तालुक्यात एक नव्हे तर सोळा सिंचनाचे मध्यम प्रकल्प बांधले. गिरीष महाजन पाच वर्ष पाटबंधारे मंत्री होते. त्यांनी काय केले?, असा प्रश्न उपस्थित करुन तालुक्यातील एक धरण दोन कोटीत बांधायचे असतांना ४६ कोटी खर्च केले. धरण बांधले की, कमाई केली? असा प्रश्न उपस्थित करुन खोडपे सरांना निवडून आणणारच, अशी ग्वाही त्यांनी दिली. सभेत माजी मंत्री डॉ.सतीष अण्णा पाटील, खा.अमोल कोल्हे, पाळधीचे डॉ.मनोहर पाटील, तोंडापूरचे डी.के.पाटील यांचीही भाषणे झाली.
व्यासपीठावरच खोडपे झाले ‘नतमस्तक’
दिलीप खोडपे सरांचा रा.काँ.पक्षात प्रवेश झाल्यानंतर त्यांनी व्यासपीठावरुन उपस्थित जनसमुदायास नतमस्तक होत साक्षात साष्टांग नमस्कार घातला. त्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त करुन अवाक झाल्याचे सभास्थळी दिसून आले. त्यांच्यातले असलेले ‘माणूसपण’ उपस्थितांना दिसून आले.
यांची होती उपस्थिती
सभेला माजी मंत्री गुलाबराव देवकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, ॲड. रवींद्र पाटील, ॲड.रोहिणी खडसे, रावेरचे श्रीराम पाटील यांच्यासह रा.काँ.चे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.