मुक्ताईनगरला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या चौथऱ्याचे काम सुरू असताना दोन मजूर जखमी

0
10

सळयांचा पिंजरा अंगावर पडून जखमी

साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :

शहरातील प्रवर्तन चौकामधील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात उभारण्यात येत असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याचे काम सुरू असतांना सळयांचा पिंजरा अंगावर पडून झालेल्या अपघातात दोन मजूर किरकोळ जखमी झाल्याची घटना शुक्रवारी, २० सप्टेंबर रोजी सकाळी घडली.

सविस्तर असे की, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने मुक्ताईनगरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. त्याचे काम प्रवर्तन चौकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात सुरू आहे. पुतळ्यावरून मध्यंतरी आमदार पाटील आणि आमदार खडसे समर्थकांमध्ये वाद झाले होते.

दरम्यान, शुक्रवारी पुतळ्यासाठीचा चौथरा उभारण्याचे काम सुरू असतांना मजुरांच्या अंगावर सळ्यांचा (आसाऱ्या) पिंजरा पडला. त्यात दोन मजूर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या मजुरांमध्ये लखन शर्मा, विजय शर्मा यांचा समावेश असून ते बिहारमधील कटिहार येथील रहिवासी आहेत.

सोशल मीडियावर अफवा पसरवू नयेत

अपघाताची माहिती मिळताच शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी मजुरांना तात्काळ मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. दरम्यान, या साधा अपघात असून कुणीही याप्रकरणी सोशल मीडियावर अफवा पसरवू नयेत, असे आवाहन प्रशासन व शिवसैनिकांच्यावतीने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here