नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा सापडला अतिक्रमणाच्या विळख्यात

0
75

पुतळा खुला करून पुतळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी प्रहार जनशक्तीतर्फे आंदोलनाचा इशारा

साईमत/मलकापूर/प्रतिनिधी :

‘तुम मुझे खुन दो मै तुम्हे आझादी दुंगा’ चा नारा देणाऱ्या देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असतांनाही न.प. प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. तेव्हा अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेला हा पुतळा खुला करून पुतळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवावे, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अजय टप यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे. याबाबत न.प. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास लवकरच न.प. कार्यालयासमोर बाभळीच्या काट्यांवर बसून उपोषण करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.

स्थानिक तहसील चौक परिसरात देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा व स्मारक उभारण्यात आलेले आहे. मात्र, गत काही वर्षांपासून पुतळ्याच्या व स्मारकाच्या भिंतीलगत मुक्ताईनगर रोड, आठवडी बाजार रोड, परिसराच्या समोर काही व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटून त्याठिकाणी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नेताजींचा पुतळा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडून पुतळा परिसराचे वैभव झाकल्या जात आहे.

न.प. प्रशासनाकडून जाणिवपूर्वक दुर्लक्ष

यासंदर्भात अनेकदा न.प. प्रशासनाकडे तोंडी माहिती देऊन पुतळा व स्मारक परिसरातील अतिक्रमण हटविण्याबाबत मागणी करण्यात आली. परंतु याकडे कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतलेल्या न.प. प्रशासनाकडून जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे. तेव्हा तातडीने देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याजवळ झालेले अतिक्रमण न काढल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने न.प. कार्यालयासमोरच बाभळीच्या काट्यावर बसून उपोषण करावे लागेल, असा इशारा अजय टप यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here